योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता विद्यापीठाचा ‘जीईआर’ हा २५ टक्क्यांच्या जवळपासच आहे. ग्रामीण भागात तर विद्यार्थ्यांच्या नोंदणीचाच अनुशेष आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील ४० टक्के तालुक्यांत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीचे गुणोत्तर हे २०हून कमी आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासाठी नोंदणी करणे अपेक्षित असते. मात्र शैक्षणिक असमतोलाचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसतो. विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेशच घेत नाहीत. त्यामुळे ‘जीईआर’चे प्रमाण वाढत नाही, असे विद्यापीठ कार्यक्षेत्रात चित्र आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याचे उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण म्हणजेच ‘जीईआर’ हा ३९.८० टक्के आहे. मात्र अनेक विद्यार्थी हे बाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी जातात.त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा प्रत्यक्ष ‘जीईआर’ हा अवघा २४.७५ टक्के इतका आहे. वर्धा, नागपूर व भंडारा या शहरांमध्ये ‘जीईआर’चे प्रमाण हे ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण फारच कमी आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात एकूण ३७ तालुके आहेत. यातील १५ जिल्ह्यांमध्ये ‘जीईआर’चे प्रमाण हे २० टक्क्यांहून कमी आहे.
हिंगणा, आष्टी, तिरोडाची स्थिती बिकटकाही तालुक्यांमध्ये तर ‘जीईआर’चे प्रमाण अवघे १५ टक्के इतकेच आहे. येथील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी कमी प्रमाणात होणारी नोंदणी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हिंगणा (१३.९२ %), आष्टी (१२.५६%), पारशिवनी (१५.८२ %), रामटेक (१७.०२ %), गोंदिया (१६.९४ %), अर्जुनी मोर (१५.८९ %) व तिरोडा (१५.२९ %) असे ‘जीईआर’चे प्रमाण आहे.