योगेश पांडे / आशिष दुबे / मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५०० हून अधिक महाविद्यालये असली तरी, प्रत्यक्षात दर्जेदार संस्थांची संख्या ही फारच कमी आहे. विद्यापीठाने अनेक विषयांचे अभ्यासक्रम बदलले असले तरी, त्यातील ज्ञान हे काळाच्या गरजेनुसार नसल्याचे शैक्षणिक तज्ज्ञांचे मत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांची कमतरता असल्याचे चित्र आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत शिक्षणाचा हवा तसा दर्जा नसल्याने, विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागांमध्ये त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी मोठ्या शहरांकडे वळत आहेत. यामुळेच संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता, विद्यापीठाचा ‘जीईआर’ (ग्रॉस इनरोलमेंट रेशो) हा २५ टक्क्यांच्या जवळपासच आहे. ४० टक्के तालुक्यात उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीचे गुणोत्तर हे २० हून कमी आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम तसेच नोंदणीचा हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.साधारणत: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासाठी नोंदणी करणे अपेक्षित असते. मात्र शैक्षणिक असमतोलाचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसतो. विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेशच घेत नाहीत.शिवाय विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांशी संबंधित तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे. मात्र उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमांची रचना झालेली नाही. हजारो विद्यार्थी हे केवळ अभ्यासक्रमाचा दर्जा आणि ‘अपडेटेड’ प्रात्यक्षिकांवर आधारित प्रणाली नसल्यामुळे दुसऱ्या शहरांकडे जात आहेत. मागील काही वर्षांपासून हे प्रमाण जास्त वाढीस लागले आहे. केवळ मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्लीच नव्हे तर अनेक विद्यार्थी चक्क भोपाळ, इंदूर, रायपूर या शहरांकडेदेखील वळू लागले आहेत.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याचे उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण म्हणजेच ‘जीईआर’ हा ३९.८० टक्के आहे. मात्र अनेक विद्यार्थी हे बाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी जातात. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा प्रत्यक्ष ‘जीईआर’ हा अवघा २४.७५ टक्के इतका आहे. वर्धा, नागपूर व भंडारा या शहरांमध्ये ही टक्केवारी ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण फारच कमी आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात एकूण ३७ तालुके आहेत. यातील १५ तालुक्यांमध्ये ‘जीईआर’ २० टक्क्यांहून कमी आहे.
महाविद्यालयांमध्ये सुविधाच नाहीविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचादेखील अभाव आहे. अभियांत्रिकीच्या काही शाखांमधील ‘प्रॅक्टिकल’ हे अगदी ‘अपडेटेड’ आहेत. मात्र महाविद्यालयांमध्ये त्यासंदर्भात आवश्यक यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान नाही. ‘पॉलिटेक्निक’ चेदेखील तसेच हाल आहेत. ‘आयटीआय’मध्ये तर कौशल्यालाच महत्त्व आहे. मात्र तेथे वर्षानुवर्षे चालत आलेले तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. विज्ञानचे काही अभ्यासक्रम सोडले तर वाणिज्य व कला शाखेतदेखील पारंपरिक प्रणालीवरच भर देण्यात येत आहे. महाविद्यालयांचे शैक्षणिक अंकेक्षण होत नाही. दुसरीकडे बाहेरील विद्यापीठांमध्ये जगाचा वेग, शिक्षण क्षेत्रातील बदल, उद्योग क्षेत्रातील गरज लक्षात घेता अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यामुळेच तिकडे विद्यार्थ्यांची पावले वळत आहेत.
ग्रामीण भागात दयनीय स्थितीकौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम नसल्याने तसेच पुस्तकी ज्ञानावरच भर देण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागात तर आणखी वाईट स्थिती आहे. तेथील विद्यार्थ्यांचे ‘बेसिक’च स्पष्ट नसते. पदवी मिळाल्यानंतरदेखील विषयातील तांत्रिक ज्ञान नावापुरतेच असते. काही तालुक्यांमध्ये तर ‘जीईआर’चे प्रमाण अवघे १५ टक्के इतकेच आहे. येथील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी कमी प्रमाणात होणारी नोंदणी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हिंगणा (१३.९२ %), आष्टी (१२.५६%), पारशिवनी (१५.८२ %), रामटेक (१७.०२ %), गोंदिया (१६.९४ %), अर्जुनी मोर (१५.८९ %) व तिरोडा (१५.२९ %) असे ‘जीईआर’चे प्रमाण आहे.विद्यापीठाच्या जीईआरची आकडेवारीजिल्हा ‘जीईआर’नागपूर २५.६९ %वर्धा २३.९९ %भंडारा २७.२७ %गोंदिया १९.९० %