प्रवाशांचे हाल : बसस्थानकावर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली
नागपूर : मोकाट कुत्रे, सार्वजनिक शौचालयातून दुर्गंधी आणि जागोजागी बांधकामाचे साहित्य विखुरलेले असल्यामुळे शहरातील गणेशपेठ बसस्थानकाची अवस्था वाईट झाली आहे. या स्थितीत प्रवाशांना बसची वाट पाहत उभे राहावे लागत असल्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
गणेशपेठ बसस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु त्या तुलनेत प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा फारशा नाहीत. बसस्थानकाला बसपोर्टचे स्वरुप देण्यासाठी काम सुरु आहे. परंतु हे काम मध्येच थांबविण्यात आल्यामुळे या कामासाठी आणलेले साहित्य जागोजागी पडून आहे. बसस्थानकावर असलेल्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्यामुळे या दुर्गंधीतच उभे राहून प्रवाशांना बसेसची वाट पाहावी लागत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत असून एसटी महामंडळाने बसस्थानकावर प्रवाशांना होत असलेल्या असुविधा दूर करून त्यांना चांगली सेवा पुरविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
..............
एकूण फेऱ्या : ८००
प्रवाशांची संख्या : १५ हजार
मोकाट कुत्रे वाढले
गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर बसेसची वाहतुक सुरु असते. अनेक प्रवासी बसची वाट पाहत बसस्थानकावर बसतात. परंतु येथे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. प्रवासी बसलेल्या ठिकाणी हे मोकाट कुत्रे फिरतात. तर अनेक कुत्रे प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बेंचच्या खाली झोपलेले दिसतात. यामुळे प्रवाशांना या कुत्र्यांनी चावा घेण्याचीो भीती वर्तविण्यात येत आहे. एसटी प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
गडर लाईनची झाकणे उघडी
गणेशपेठ बसस्थानकावर अनेक ठिकाणी गडरलाईनची झाकणे काढून बाजुला ठेवलेली आढळली. गडर लाईनची झाकणे उघडी असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. अनेकदा बसमध्ये बसण्याच्या घाईत प्रवाशांचा तोल जाऊन प्रवासी गडरलाईनमध्ये पडण्याची भीती आहे. यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी गडरलाईनची झाकणे लावण्याची गरज आहे.
शौचालयातून दुर्गंधी
प्रवाशांच्या सुविधेसाठी त्यांना स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु गणेशपेठ बसस्थानकावर शौचालयातून कमालीची दुर्गंधी येत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसची वाट पाहत अनेकदा प्रवासी बसस्थानकावर उभे राहतात. त्यांना नाकाला रुमाल लाऊन बसस्थानकावर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बसस्थावरील शौचालय स्वच्छ ठेवण्याची मागणी होत आहे.
.........
असुविधांबाबत पाठपुरावा करणार
‘गणेशपेठ बसस्थानकावर असलेल्या मोकाट कुत्र्यांबाबत महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. बसस्थानकावर बांधकाम साहित्य जागोजागी पडून आहे. हे साहित्य नेण्यासाठी विभागीय अभियंता (स्थापत्य) यांना संपर्क साधण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांना काही असुविधा होत असतील तर त्यांचा पाठपुरावा करून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
.............