नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील बॅग स्कॅनर मशीन बंद पडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मशीन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दोन बॅग स्कॅनर मशीन आहेत. एक मशीन पश्चिमेकडील भागात मुख्य प्रवेशद्वारावर तर दुसरी मशीन पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील प्रवेशद्वारावर आहे. यातील पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील बॅग स्कॅनर मशीन मागील अनेक दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे प्रवासी विनातपासणी रेल्वेस्थानकाच्या आत शिरत आहेत. यात दारूची तस्करी, पैशांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीना यांनी एका प्रवाशाच्या बॅगमध्ये असलेली ६० लाखांची रक्कम पकडली होती. बॅग स्कॅनर मशीन सुरू असल्यास त्यात बॅगमध्ये असलेले सर्वच साहित्य दिसते. त्यामुळे ही मशीन सुरू करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. रेल्वे सुरक्षा दलाने ही मशीन सुरू करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.
..........
पूर्वेकडील बॅग स्कॅनर मशीनला १० ते १२ वर्षे झाल्यामुळे ही मशीन खराब झाली आहे. नवी मशीन खरेदी करण्यासाठी मुख्यालयाला पत्र देण्यात आले आहे. मंजुरी मिळताच नवी मशीन खरेदी करण्यात येईल.
-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल