लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू शब्दांची कैफी जशी त्या शब्दांशी खेळणाऱ्या शायरांवर चढते तशी ती ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही धुंद करते. हे शब्द एका धाग्यात गुंफले की कधी ती शायरी होते तर कधी गझलचे रूप घेत मनातही ‘मिठ्ठास’ घोळते. शनिवारी अशीच एक गझल अन् शायरीची मैफिल सजली. हार्मोनियमशिवाय संगीताचे सूर नव्हते पण गझलांची कैफी अन् शायरीतील उर्दू शब्दांची जादू तशीच होती. पण या शायरीवर चालणाऱ्या कथ्थक नृत्याने नवाच अविष्कार घडविला. शायरी, गझल अन् कथ्थकने सजलेली ही मैफिल श्रोत्यांच्या मनात ‘बहका रहा अहसास का दरिया, सहर होने तक...’ प्रमाणे खोलवर उतरत गेली.मोमेंट क्राफ्टर्सतर्फे कविता बाकरे आणि सायली देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित या मैफिलीची संकल्पना सुप्रसिद्ध निवेदिका नीरजा आपटे यांची होती. नीरजा यांनी या संपूर्ण कार्यक्रमात त्यांच्या शायरीने गोडवा भरला. कार्यक्रमाची सुरुवातच अनोख्या अंदाजात झाली. प्रसिद्ध गझल आणि शास्त्रीय गायिका गायत्री ढवळे यांनी ‘राह मे बिछी है पलके आओ...’ ही गझल सुरू केली आणि अबोली थत्ते यांनी त्याच अंदाजात कथ्थक नृत्य करीतच मंचावर प्रवेश घेतला. कथ्थक विशारद अबोली, शास्त्रीय गायक गायत्री व नीरजा या तिन्ही महिला कलावंतांनी हा मुशायरा रंगतदार केला. शायरी व गझलची चर्चा निघाली की आमीर खुसरो, मिर्झा गालिब, मीर तकी मीर यांची आठवण येते. पण या क्षेत्रात महिला शायरचेही योगदान मोठे आहे. शहजादी जैबुन्निसा, परवीन शाकीर, अंजूम रहबर, फामीदा रियाज, अमृता प्रीतम, मोनिका सिंह, शमशाद नझमा तसद्दुक, डॉ. जरीना सानी अशा महिला शायरांच्या नज्म या मैफिलीत पेश केल्या. ‘मैने ढुंडा साज ए फितरत मे उसे’ या शायरीवर नृत्यासह मैफिल सुरू झाली. ‘जुदा हो मुझसे मेरा यार खुदा ना करे...’तून जैबुन्निसाची भावना त्यांनी मांडली. पुढे गायत्री यांनी ‘भुल के भी न दर्द को दिल से जुदा समझ...’ ही हळुवार गझल पेश केली. अमृता प्रीतम यांची ‘खामोशी के पेड से मैने यह अक्षर नही तोडे...’ ही शायरी कथ्थक नृत्यासह श्रोत्यांना भावली. ‘पहले उसने तराशा कांच से वजुद मेरा, फिर शहर भर के हाथो मे पथ्थर थमा दिये...’ ही शायरी रसिकांची वाहवा मिळवून गेली. ‘रंजीश ही सही, दिल को दुखाने आजा...’ ही प्रसिद्ध गझल गायत्री यांनी पेश केली तेव्हा श्रोत्यांनी टाळ्याच्या गजरात अभिवादन केले. एक एक शायरी, पेश होणारी हळुवार गझल आणि नायाब अंदाजातील नृत्य..., मुशायऱ्यातील प्रत्येक गोष्ट रसिकांसाठी अलौकीक अनुभव होती.