लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उमरेड मार्गावरील पाचगाव येथील अडवाणी ढाब्याचे मालक विष्णू अडवाणी यांच्याकडून दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष गोविंद काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांच्या न्यायालयाने १ लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर केला. कथित अतिक्रमण प्रकरणी कारवाई न करण्यासाठी काळे यांनी अडवाणी यांच्याकडे ५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. २७ जून रोजी ढाब्याच्या परिसरात एसीबीने लाचेचा सापळा रचून उपनिरीक्षक संजय चव्हाण यांना ठाणेदार काळे यांच्या वतीने दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीचे पथक कुही पोलीस ठाण्यात दाखल झाले असता पोलीस गणवेश बदलण्याच्या बहाण्याने पोलीस निरीक्षक काळे हे पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या २२४ कलमान्वये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ रोजी त्यांना धंतोली बगिच्याच्या परिसरात अटक करण्यात आली होती. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. प्रकाश नायडू, अॅड. पंकज ठाकरे, अॅड. होमेश चव्हाण आणि अॅड. राहुल राठे यांनी काम पाहिले.
लाचखोरीतील ठाणेदाराला जामीन
By admin | Published: July 01, 2017 2:28 AM