गोळी हुकल्याने लोखंडी चमचा मारला होता फेकूननागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘शेर-ए-पंजाब’ हॉटेलमधील एका कामगाराच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. नागेंद्र ऊर्फ झिनक देवनारायण यादव रा. बालाजीनगर एमआयडीसी, असे आरोपीचे नाव आहे. रमेश शाहू, असे मृताचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी होता. प्रकरण असे की, ६ आॅगस्ट २०१५ रोजी पेंढरी शिवारात अनोळखी मृतदेह आढळून आला होता. पॉलिथिन पिशवीने मृताचा चेहरा झाकलेला होता. डोक्यावर डाव्या भागाला जखम होती. नायक पोलीस शिपाई राजेश सरमाके यांच्यामार्फत सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी तक्रार दाखल केली होती. मृतदेह ओळख पटवण्यासाठी शवागारात ठेवण्यात आला होता. ओळख न पटल्याने मृतदेहाची १० आॅगस्ट २०१५ रोजी विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांचा तपास सुरू असतानाच मध्य प्रदेश येथील प्रमोद शाहू नावाच्या व्यक्तीने आपले वडील एमआयडीसी येथील शेर-ए-पंजाब हॉटेलमधून ५ आॅगस्ट २०१५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. छायाचित्र आणि कपड्यावरून मृताची ओळख पटली होती. मृतदेह प्रमोदच्या वडिलांचा होता. पोलिसांनी संशयित म्हणून एमआयडीसी मातोश्रीनगर भागात राहणाऱ्या मनोज ऊर्फ रानटी यादव याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता खुनाचा पर्दाफाश झाला होता. मनोजने रमेश शाहू याच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली होती. ती हुकल्याने त्याने लोखंडी चमचा आणून तो रमेशच्या डोक्यावर फेकून मारला होता. परिणामी रमेश हा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला होता. त्यानंतर मनोज आणि नागेंद्र या दोघांनी रमेश शाहू याचा मृतदेह मारुती स्विफ्ट कारमध्ये कोंबून पेंढरी शिवारात फेकून दिला होता. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यापैकी नागेंद्र याने जामीन अर्ज दाखल करताच प्रकरण गंभीर असल्याने आणि गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत खराबे हे आहेत.(प्रतिनिधी)
हॉटेल कामगाराच्या खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 15, 2016 3:02 AM