तानाबाई सावसाकडे हत्या प्रकरणात आरोपी मुलीला जामीन मंजूर
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: July 28, 2023 05:12 PM2023-07-28T17:12:04+5:302023-07-28T17:12:30+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित घटना
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील बहुचर्चित तानाबाई सावसाकडे हत्याकांडातील आरोपी मुलीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला.
वंदना विनोद खाटे (३५) असे आरोपीचे नाव आहे. वंदना व सून चंद्रकला प्रभाकर सावसाकडे (४०) यांनी हिस्सेवाटणीच्या वादातून ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मोहाळी (नलेश्वर) येथे तानाबाई (६५) हिची चादरीने नाक-तोंड दाबून हत्या केली. तानाबाईला आरोपींना शेतीचा वाटा द्यायचा नव्हता. त्यामुळे तिने दिवाणी दावा दाखल केला होता. परिणामी आरोपी संतापले होते, अशी तक्रार आहे. वंदनाने सुरुवातील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. वंदनातर्फे ॲड. भूषण डफळे यांनी बाजू मांडली.
आरोपी चंद्रकलाला जामीन मिळाला आहे. तसेच, पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून जेएमएफसी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे वंदनाला कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असा युक्तीवाद ॲड. डफळे यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वंदनाला जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले.