कळमेश्वर/पारशिवनी/इसापूर/कुही : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सव साजरे करताना खबरदारी बाळगावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तान्हा पोळ्याचे मोठे समारंभ साजरे होऊ शकले नाही. परंतु गावात आणि वस्त्यांमध्ये छोटेखानी तान्ह्या पोळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत, नंदीला आकर्षक सजवित पोळ्यात सहभागी होऊन आनंद लुटला. कळमेश्वर येथे देशमुख ले-आउट, शिक्षक कॉलनी, हुडको कॉलनी येथे तान्हा पोळा साजरा करण्यात आला. मात्र येथे बहुतांश मुले आणि पालकांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाहीत.
सावनेर तालुक्यातील इसापूर येथे बुद्धविहार परिसरात तान्हा पोळा भरवण्यात आला होता. यात परिसरातील लहान मुले नंदीबैलासह सहभागी झाले.
पारशिवणी तालुक्यात ठिकठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्यात आला. तान्हा पोळा होणार की नाही हा बालगोपालात चर्चेचा विषय झालेला होता. अशा स्थितीत विविध ठिकाणी पालकांनी पुढाकार घेत तान्हा पोळा आयोजित करण्याचे ठरविले. पारशिवनी येथील साई ले-आउट परिसर, बजरंग बली मंदिर परिसर व विविध प्रभागात पोळा साजरा करण्यात आला. मांढळ येथे राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त नंदीबैल सजावट व उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी दहा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान-मुलांना असताना वस्त्या आणि गावातही कार्यक्रम कशाला असाही सूर यावेळी उमटला.
070921\img_20210907_165218.jpg
तान्हा पोळा