नरेश डोंगरे
नागपूर : २ जून सायंकाळी साधारणत: ७ ची वेळ असावी. मला मिळालेला पहिला निरोप ट्रेन पटरीवरून उतरली असावी, अशा आशयाचा होता. मात्र, घटनास्थळी पोहचलो तेव्हा काही क्षण सुन्नच झालो. कल्पनेच्या पलिकडचा अपघात होता. घुप्प अंधाराला किंकाळ्या चिरून जात होत्या. जस जसे समोर जात होतो तस तसे जखमी अन् वेदनांनी विव्हळणारे दिसत होते. फारच विदारक होते. वेळ यंत्रासारखीच जलदगतीने निर्णय घ्यायची होती, हे उद्गार आहेत महाराष्ट्राच्या त्या सूपुत्राचे ज्याने देश-विदेशात चर्चेला आलेल्या बालासोर (ओडिशा) येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतरची संपूर्ण परिस्थिती हाताळली. शेकडो जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचविले... नाव आहे, दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे !
वडगाव, सावताळ (ता. पारनेर) येथील मुळ निवासी असलेले दत्तात्रेय उर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये भीषण अपघात झाला अन् त्यात तीनशेच्या आसपास व्यक्तींचे जीव गेले. शेकडो जणांना गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी पोहचलेल्या शिंदे यांनी त्या क्षणापासून यंत्रासारखे जलदगतीने निर्णय घेतले, तसेच मदतकार्यही राबविले. 'लोकमत' प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून 'ऑपरेशन बालासोर' जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक व्यस्त असूनही सहकाऱ्यांना आवश्यक निर्देश देतादेताच त्यांनी लोकमतला माहितीही दिली. ते म्हणाले, तेथे त्यावेळी खूप अंधार होता. त्यामुळे सर्वप्रथम मोबाईलचे टार्च, सोबतच्या वाहनांच्या लाईटसने प्रकाश करून जखमींना हलविणे सुरू केले. हे करतानाच ५० वर लाईट टॉवर लावून जनरेटरच्या मदतीने प्रकाश व्यवस्था केली. जखमींना वाचविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजुबाजुच्या शहरातील विविध ईस्पितळात पाठविले ठिकठिकाणच्या एम्बुलन्स बोलवून काही जखमींवर जागीच उपचार करून घेतले.
आम्ही अडीच हजार अन् शेकडो देवदूत
लोकमतशी बोलताना शिंदे यांनी देवदुतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करतो. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहानभूक विसरून मदतकार्य करीत आहेत. एक आवाहन केले आणि शेकडो नागरिक रक्तदानासाठी हजर झाले. शेकडो हात जखमींना एम्बुलन्समध्ये आणि मृतदेह रुग्णालयात पोहचविण्यास सरसावले. भूक तहान विसरून, कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फुर्तीने या देवदुतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनिय असल्याचेही ते म्हणाले.
आता 'त्यांना' सर्वोच्च प्राधान्य
आता कशाला प्राधान्य देताहात, असे विचारले असता शिंदे म्हणाले, जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतची प्रायोरिटी होती. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना घरपोच डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत देण्याला प्राधान्य देत आहोत. प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाही. त्यामुळे वेेगवेगळ्या पथकांना डेथ सर्टीफिकेट आणि सरकारी मदत मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.