नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुसळधार पावसामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावरच्या नागरी - चिकणी दरम्यानच्या रुळावरची गिट्टी वाहून गेली. त्यामुळे रेल्वेची डाऊन लाईन पुरती प्रभावित झाली आहे. ही रेल्वेलाईन धोकादायक स्थितीत आल्याचे लक्षात येताच काही गाड्या नजिकच्या स्थानकांवर थांबवून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरची रेल्वे वाहतूक आज रात्री बंद केली.
विदर्भातील अनेक भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागातील शेतात, रेल्वेलाईन नजिकच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावर नागरी - चिकणी रेल्वेस्थानका दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरची गिट्टी पुरती वाहून गेली. परिणामी ट्रॅक उघडा पडला. हा प्रकार मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी तुकडी घटनास्थळी पाठवून ट्रॅक पुर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन नंबर १२७२२ निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेस नागरी रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आली. तर, ०३२५३ पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेसला वाघोली विभागात रोखण्यात आले. या मार्गाने धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांनाही या घडामोडीची सूचना देण्यात आली. परिणामी अनेक गाड्यांचा वेग आपसूकच मंदावला आहे.डाऊन लाईन बंद, अप लाईन सुरू
खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा बल्लारपूर रेल्वे मार्गावरची डाऊनलाईन रात्री ९ वाजतापासून बंद करण्यात आली. मात्र, अपलाईन सुरळीत असल्याने या मार्गावरची वाहतूक जैसे- थे ठेवण्यात आली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ट्रॅकवर लक्ष ठेवून आहेत. सुरळीत व्हायला किती वेळ लागेल, हे स्पष्ट नाही. मात्र, पाण्याचा जोर ओसरताच ही लाईन पुर्ववत करून वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
छोट्या स्थानकांवर मोठी गैरसोय
निझामुद्दीन हैदराबाद ही गाडी नागरी तर पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेस वाघोली स्थानकाजवळ थांबविण्यात आली आहे. ही दोन्ही रेल्वेस्थानकं छोटी आहेत. तर लांब पल्ल्याच्या या दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणांवर प्रवासी आहेत. छोट्या स्थानकांवर खाण्या-पिण्याचे स्टॉल मर्यादित असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.