नागपूर : कोराडी रोडवरील ओम नगर येथील इरॉस को ऑप सोसायटी मधील रस्त्यांवर डांबरीकरण करण्यासाठी महिनाभरापासून गिट्टी टाकली आहे. परंतु डांबरीकरण होत नसल्याने परिसरातील नागरित्र त्रस्त्र झाले आहेत. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
इरॉस को ऑप सोसायटीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी कंत्राटादाराने रस्त्यांवर गिट्टी टाकली. परंतु महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकून ठेवल्याने वाहनचालक वाहन घसरून जखमी होत आहेत. गाड्या पंचर होत आहेत. लहान मुलांना गिट्टीपासून इजा होण्याचा धोका आहे. महापालिकेच्या प्रभाग एक मधील इरॉस को ऑप सोसायटीचा परिसर हा तसा अविकसित आहे. ही सर्वसामान्य नागरिकांची वसाहत आहे. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्या विकासापासून दूर आहेत. कुठे पाण्याची समस्या तर कुठे गटार लाईन व रस्त्यांची समस्या आहे.
परिसरातील नागरिकांनी या भागातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील इतर भागांसारखे रस्त्यांचे डांबरीकरण इथेही करावे, अशी मागणी इरॉस को ऑप सोसायटी येथील नागरिकांनी केली आहे. त्यानुसार डांबरीकरणासाठी रस्त्यांवर गिट्टी टाकली परंतु डांबरीकरण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. शहरातील इतर भागांप्रमाणे या भागाचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. भागातील नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिक निवेदने देतात, मात्र प्रशासन त्याची दखल घेत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.