विदर्भ माझा लढवणार निवडणुका : राजकुमार तिरपुडे यांची घोषणा नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन आता हळूहळू जोर धरू लागले आहे. सर्व विदर्भवादी एकजूट होत आंदोलन करीत आहेत. यातच आता ‘बॅलेट’ने सुद्धा लढण्याची तयारी सुरू झाली आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर विदर्भ माझा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा विदर्भ माझाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. तिरपुडे महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते वामनराव कोंबाडे प्रामुख्याने उपस्थित होते. राजकुमार तिरपुडे म्हणाले, विदर्भ माझा या राजकीय पक्षाची स्थापना गेल्या १६ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. नवीन पक्ष असल्याने संघटन बांधणीसाठी आपण संपूर्ण विदर्भाचा दौरा केला आहे. पक्षाची चांगली बांधणी झाली आहे. विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढण्याची हीच योग्य वेळ आहे. विदर्भासाठी लढत असलेल्या सर्व संघटनांसोबत आपली चर्चा झाली आहे. त्यानंतरच आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आॅक्टोबरमध्ये विदर्भातील नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांपासूनच आपण याची सुरुवात करणार आहोत. त्यानंतर महानगरपालिका व सर्व निवडणुका लढवल्या जातील. विदर्भाच्या मुद्याला राजकीय स्वरूप दिल्याशिवाय आंदोलनाला गती मिळणार नाही. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय स्वरूप प्रदान करण्यासाठी आपण निवडणुका लढविणार असल्याचे राजकुमार तिरपुडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)भाजपाने केला भ्रमनिरास स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर काँग्रेसने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व मनसे यांचा विरोधच राहिला आहे. केवळ भाजपानेच स्वतंत्र विदर्भाचे समर्थन केले होते. त्यामुळे ते सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य देतील, असे वाटले होते. त्यामुळे आपण त्यांना सहकार्यसुद्धा केले. परंतु भाजपाने संपूर्ण वैदर्भीय नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका राजकुमार तिरपुडे यांनी केली.
विदर्भवाद्यांचे ‘बॅलेट’ आंदोलन
By admin | Published: May 07, 2016 2:56 AM