लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.कुख्यात गुंड चेतन हजारे, रजत तांबे, असीम लुडेरकर, अनिकेत मंथापुरवार आणि भारत पंडित या पाच जणांनी अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळच्या चौकात दिवसाढवळ्या बाल्या बिनेकरची निर्घृण हत्या केली. या गुन्ह्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे येथील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याची जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, सीताबर्डी पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. आतापर्यंत सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी चेतन हजारे याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस चेतन हजारेच्या कथनावर विश्वास ठेवून चुप्पी साधून बसले आहेत. हजारेजवळ बाल्याच्या हत्येचे कारण आहे. मात्र इतर आरोपींनी गुन्ह्यात जो अमानुषपणा दाखवला, त्यातून त्यांना कशाचा सूड घ्यायचा होता, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलिसांजवळ त्याचे उत्तर नाही. शहरात आणि खुद्द पोलीस दलातही या गुन्ह्यात संबंधित असलेल्या संशयितांची नावे घेतली जात असताना तपास करणारे पोलिस जाणीवपूर्वक चुप्पी साधून बसले की काय, अशी शंका घेतली जात आहे.गुन्हे शाखेकडून अपेक्षाया प्रकरणातील पडद्यामागच्या सूत्रधारांना हुडकून काढण्याची कामगिरी गुन्हे शाखा बजावू शकते, अशीही जोरदार चर्चा शहरात आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत आलेल्या अनेक संशयितांनी आपापले मोबाईल बंद केल्यामुळे त्यांच्याभोवतीचा संशय अधिकच घट्ट झाला आहे.बाल्याचा परिवार दहशतीतया घटनेनंतर बाल्या बिनेकरचा परिवार प्रचंड दहशतीत आला असून त्याच्या पत्नीने काचीपुरा धरमपेठमधील भाड्याचे घरही खाली करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरे म्हणजे, बाल्याच्या परिवारातील काही सदस्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे.
बाल्या बिनेकर हत्याकांड : पोलिसांची चुप्पी संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:43 PM