लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाच्या नावाखाली शहरात अवैध वृक्षतोड सुरू असतानाच हिरवळ व वृक्षलागवडीच्या नावाखाली नाल्याच्या पात्रात झाडे लावण्याचा प्रताप उद्यान विभागाने हाती घेतला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील खामला भागातील शास्त्री ले-आऊ ट येथील नाल्याच्या पात्रात बांबूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. दोन-चार वर्षात बांबूची झाडे वाढल्यानंतर नाल्याच्या प्रवाहात बाधा निर्माण होणार आहे. पूर आल्यास बांबूच्या झाडामुळे आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होणार आहे. तसेच घाणीमुळे डासांचाही प्रकोप वाढला आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शविल्यानतंरही महापालिकेच्या उद्यान विभागाने येथे बांबूची झाडे लावली आहेत.शास्त्रीनगर भागातून वाहणारा हा नाला पुढे स्वावलंबीनगर, जीवनछायानगर, रवींद्रनगर, जयप्रकाशनगर व बेलतरोडी भागात पोहरा नदीला मिळतो. या नाल्यात परिसरातील वस्त्यातील सिवरेज प्रक्रिया न करता सोडले जाते. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. त्यातच आता बांबूची लागवड करण्यात आल्याने हा त्रास आणखी वाढणार असल्याचे स्थानिक रहिवासी रवींद्रसिंग खुराणा डॉ. मोहन देशपांडे यांनी सांगितले. नाल्याच्या परिसरातील वस्त्यातील सिवरेज थेट नाल्यात न सोडता गडर लाईनच्या माध्यमातून ट्रक लाईनला जोडण्याची नागरिकांची मागणी आहे. लाईन टाकण्यात आली परंतु अद्याप कार्यान्वित झालेली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.पुराच्या पाण्यामुळे जमीन वाहू नये यासाठी बांबूची झाडे लावली जातात. परंतु नाल्याला दोन्ही बाजूला संरक्षण भिंत असताना जमीन वाहून जाण्याचा धोका नाही. उलट बांबूची झाडे लावल्याने नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. त्यातच नाल्यात सिवरेज सोडले जात असल्याने पाण्याचा प्रवाह थांबल्यास आजूबाजूच्या लोकांचा त्रास वाढणार आहे.पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नदी, नाले सफाई अभियान राबविले जाते. नदी-नाल्यातील गाळ काढण्यासोबतच पात्रातील झाडे, झुडपे तोडून पाण्याच्या प्रवाहातील अडसर दूर केला जातो. दुसरीकडे उद्यान विभागानेच नाल्याच्या पात्रात बांबूची झाडे लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शहरातील नदी-नाले ओव्हर फ्लो झाले होते. यात शास्त्रीनगर येथील नाल्याचाही समावेश होता. याची जाणीव असतानाही नाल्याच्या पात्रात बांबूची लागवड करण्यात आली आहे.डासांमुळे नागरिक त्रस्तनागपूर शहर व जिल्ह्यात स्क्रब टायफस आजारासोबतच डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे. परिसरात स्वच्छता नसल्याने, पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. शास्त्रीनगर येथील नाल्यात पाणी साचून असते. त्यात बांबूच्या झाडांची भर पडली आहे. नाल्यात जंतुनाशक औषधाची फवारणी केली जात नाही. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक डासांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत.नाल्यातून पावसाचेच पाणी वाहून जावेनाल्यात सोडण्यात येणारे सिवरेज रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्यावी. नाल्यातून फक्त पावसाचेच पाणी वाहून जाईल, अशी परिस्थिती निर्माण करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती रवींद्र सिंग खुराणा व डॉ. मोहन देशपांडे यांनी दिली.