नागपूर : उमरेड तालुक्यातील ‘न्यूड डान्स’ प्रकरणात बाम्हणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचास अटक करण्यात आली आहे. रितेश विनोद आंबोने (३०) असे आरोपीचे नाव आहे. त्यायानेच या न्यूड डान्सचं आयोजन केल्याचं तपासात समोर आलं आहे.
सोबतच मंडप डेकोरेशन, डीजे वाजविणारा, तसेच आणखी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांचाही चौकशी करीत त्यांना सूचना पत्रावर सोडण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली.
आतापर्यंत या प्रकरणात एकूण १६ जणांना अटक करण्यात आली असून, १२ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तीन जणांना सूचनापत्रावर सोडण्यात आले असून, आरोपी उपसरपंच रितेश आंबोने यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
रबरस्टॅम्प मारा, एन्ट्री करा
१७ जानेवारी रोजी शंकरपटाच्या आयोजनानंतर सायंकाळी ७ वाजेपासून सुरू झालेल्या ‘एलेक्स जुली के हंगामे’ हा डान्स हंगामा कार्यक्रम बंद शामियानात पार पडला. कार्यक्रम बघावयास आलेल्यांकडून १०० रुपये प्रवेश शुल्क घेतल्यावर त्यांच्या हातावर रबर स्टॅम्प मारला गेला. ‘रबर स्टॅम्प आणि मगच एन्ट्री करा’ या कामात रितेश आंबोने अग्रेसर होता, असेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
बीट जमादार चौकशीच्या घेऱ्यात
बाम्हणी बीट जमादार याच्यासह दोन पोलीस कर्मचारी तथा पोलीस पाटील हे सुद्धा चौकशीच्या घेऱ्यात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याबाबत विचारणा सुरू असून तपासणी अहवालाअंती कारवाई होण्याची संभावना व्यक्त होत आहे.