पिपळा (डाकबंगला) : इसापूर (ता. सावनेर) येथील शेतकऱ्यांनी शेतीच्या वहीवाटीसाठी रस्ता मिळावा म्हणून २००१ मध्ये तहसीलदार सावनेर यांच्याकडे अर्ज केला. त्यानुसार तहसीलदारांच्या न्यायालयाने तत्कालिन शेत सर्व्हे क्रमांक १६/३ व १७/२ शेतीच्या धुऱ्यावरून बैलगाडीसह शेतकऱ्यांना वहीवाट करण्याबाबत आदेश पारित केला हाेता. परंतु तहसीलदारांच्या त्या आदेशाला केराची टाेपली दाखवीत संबंधित शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांच्या वहीवाटीला बंदी घातली आहे. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.
शेतीच्या वहीवाटीकरिता रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव इतर शेतकऱ्याच्या शेतातून ये-जा करावी लागत आहे. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान हाेत आहे. विशेषत: ज्या शेतीच्या धुऱ्याने शेतकऱ्यांना तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून दिला. त्या शेतीमालकाच्या वारसांकडून शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. त्यामुळे वारसा हक्कानुसार शेत सर्व्हे क्रमांक १६/३ आणि १७/२ शेतीच्या धुऱ्याने बैलगाडीसह ये-जा करण्याचा हक्क साेडून, तसा आदेश तहसीलदारांनी पारित करावा. तसेच पाटबंधारे विभागाने पाटणसावंगी-खापरखेडा मायनरवर शेतीच्या वहीवाटीसाठी पूल तयार करून देण्यात यावा, अशी मागणी इसापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सतीश मासाळ यांच्याकडे केली आहे.