नागपूर : दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची जागोजागच्या रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. त्यात प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची आणखी भर पडू नये म्हणून मध्य रेल्वेने नागपूर, पुणे, मुंबईसह सात मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दि. ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार नाहीत.
दिवाळी आणि छटपूजेच्या निमित्ताने मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीची संधी साधून समाजकंटक, चोर-भामटे सक्रिय होतात. त्यामुळे प्रवाशांना मोठे नुकसान होते. एकीकडे प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वेस्थानक परिसरात पाय ठेवायला, जागा नसताना आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा त्यांना रेल्वेस्थानकावर घ्यायला येण्यासाठी अनेकजण येतात. परिणामी गर्दीत आणखीच भर पडते. तसे होऊ नये म्हणून गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्याचे ठरले आहे. त्यात फलाटावर सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्यांना रोखण्याचाही एक उपाय आहे. त्यानुसार, राज्यातील निवडकप्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दि. ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
खालील स्थानकांवर मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीट
मुख्य रेल्वेस्थानक नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर रेल्वेस्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे रेल्वेस्थानक, कल्याण रेल्वेस्थानक आणि पुणे रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही.
वृद्धांना, रुग्णांना सूट
गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे. मात्र, त्यातून ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी येेणाऱ्यांना हे निर्बंध लागू होणार नसल्याचे रेल्वेने कळविले आहे.