नागपूर : दुर्गा धोटे दहेगाववरून मोठ्या आशेने शनिवारी नागपूर कारागृहात पोहचली. तिचा लहान भाऊ एका गुन्ह्यात पाच वर्षापासून शिक्षा भोगत आहे. रक्षाबंधनाला दरवर्षी येते तशी दुर्गा याही वर्षी आली. मात्र कारागृह प्रशासनाने राखी बांधता येणार नाही, असे सांगितल्याने तिचे अंतकरण जड झाले. कशीतरी भेट घेता येईल म्हणून तिने प्रयत्न केले. मात्र भेटीच्या ओढीने घाईघाईत आधार कार्डही विसरल्याने तिला भेटही नाकारण्यात आली. कारागृहाच्या कठोर झालेल्या नियमाने राखी न बांधताच ती ओल्या डोळ्याने माघारी परतली. शनिवारी रक्षाबंधनानिमित्त कारागृहात बंदी असलेल्या भावाला राखी बांधायला आलेल्या बहिणींची व नातेवाईकांची दुर्गासारखीच अवस्था होती. प्रत्येकच माणूस गुन्हेगार नसतो. एखाद्या बेसावध क्षणी नियंत्रण सुटल्याने त्याच्या हातून गुन्हा घडतो. आणि कायद्याने त्याला शिक्षा ही भोगावीच लागते आणि कुटुंबाची ताटातूट होते. आपला भाऊ कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याच्याविषयी बहिणीचे प्रेम मात्र कमी होत नाही. त्याचेही बहिणीवर प्रेम असतेच. याच प्रेमबंधामुळे राखी पौर्णिमेला अनेक बहिणी दरवर्षी कारागृहाकडे धाव घेतात. मात्र कारागृहातून कैदी फरार होण्याचे प्रकरण आणि याकूबच्या फाशीमुळे कारागृहाचे वातावरण संवेदनशील मानल्या जात आहे. याच परिस्थितीचा फटका बहिणींना बसला असून यावेळी बंदिवानांना भेटून राखी बांधायला प्रशासनाने मज्जाव घातला आहे. याचमुळे भावाच्या भेटीच्या ओढीने आलेल्या महिलांना हिरमुसल्या चेहऱ्याने परतावे लागले. या महिलांकडून गेटवरच राखी घेऊन नंतर संबधित बंदिवानाला पोहचविल्या जात होती. दुसरीकडे असे संवेदनशील वातावरण असतांना अशासकीय संस्थांच्या महिलांना कैद्यांना राख्या बांधण्याची परवानगी दिल्याने खऱ्या बहिणींमध्ये तीव्र नाराजी दिसून येत होती. प्रसिध्दीसाठी आलेल्या महिलांना प्रवेश दिला, मग आम्हाला का नाही, असा संतप्त सवाल बहिणींकडून विचारल्या जात होता.
बंदिवानांच्या भावनांना कारागृह प्रशसनाची बंदी
By admin | Published: August 30, 2015 2:52 AM