नागपूर : सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून पतंजली आयुर्वेदच्या ‘दिव्य कोरोनील टॅबलेट’च्या विक्रीवर बंदी लावण्यात यावी अशी मागणी केली आहे.
डॉ. हर्षवर्धन, नितीन गडकरी व बाबा रामदेव यांनी १९ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन ‘दिव्य कोरोनील टॅबलेट’मुळे कोरोना आजार नियंत्रित होत असल्याचा प्रचार केला. कोणत्याही चाचणीशिवाय बाजारात आणण्यात आलेल्या दिव्य कोरोनीलची आतापर्यंत २४१ कोटी रुपयाची विक्री झाली आहे. या टॅबलेटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे मून यांनी याचिकेत नमूद केले आहे.
दिव्य कोरोनीलचा प्रचार करण्यापूर्वी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी घेण्यात आली नाही. परिणामी, केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव, केंद्रीय गृहमंत्री, इंडियन मेडिकल असोसिएशन व ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना कायदेशीर नोटीस पाठवून डॉ. हर्षवर्धन, नितीन गडकरी व बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, पण नोटीसची दखल घेण्यात आली नाही, असेही मून यांनी म्हटले आहे.