लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दंगे घडवून आणणाऱ्यांवर बंदी घातलीच पाहिजे. रजा अकादमीवर बंदी घालाच; परंतु विश्व हिंदू परिषद व बजरंग दलावरही बंदी घालण्यात यावी, असे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
लोकतंत्र बचाव या कार्यक्रमासाठी ते रविवारी नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित होते. तारीक अन्वर म्हणाले, भाजपकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करू लागले आहेत. देशात दंगे करा अन् मत मिळवा, हाच भाजपचा आजवरचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे.
पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे नाईलाजास्तव केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती किंचितशा कमी केल्या. परंतु त्याने होणार नाही. २०१४ च्या पूर्वी ज्या किमती होत्या. त्या किमतीपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किमती कराव्यात, असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप व माजी मंत्री अनिस अहमद प्रामुख्याने उपस्थित होते.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राला बदनाम करीत असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश बिहारमध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याच यांना सुचत असतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहेत. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे; मात्र आता हिंदू आणि मुस्लीम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत परत येण्याचे स्वप्न आता सकाळीही पडू लागले असल्याची टीकाही त्यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भाजपचे आंदोलन आहे. भाजपची यात दुटप्पी भूमिका आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती या केंद्राने ६० रुपयांनी कमी करायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.