नागपूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. पार्किंगसाठी वाहने ठेवायलाही जागा शिल्लक राहत नाही. सध्या एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अभ्यागतांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व कृषी विभागात अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले असल्यामुळे इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात करून ज्यांच्याकडे कार्यालयीन ओळखपत्र आहे केवळ अशांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा व अभ्यागतांना बंदी घालण्यात यावी. यापूर्वी मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त असताना हा प्रयोग करण्यात आला होता व तो यशस्वीसुद्धा झाला होता, तीच पद्धत कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- कर्मचाऱ्यांसाठी चाचणी केंद्र सुरू करा
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दररोज कोरोनाबाधित होत आहेत. सध्या नागपूर शहरात फार कमी चाचणी केंद्रे सुरू आहेत, तरी नागपूर मुख्यालयात पंचायत समितीसह ५०० ते ६०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. किमान एक कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे व सरचिटणीस नरेंद्र धनविजय यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.