धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण : पालकमंत्र्यांनी घेतला कामांचा आढावा नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. त्यांच्यासाठी भोजनदानाची व्यवस्था केली जाते. रस्त्यावरच भोजनदान होत असल्याने अनुयायांना त्रास होतो आणि एकूणच व्यवस्था मोडकळीस येते. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीला लागून असलेल्या चारही बाजूंच्या रस्त्यावर जवळपास १०० मीटर परिसरात भोजनदानास बंदी घालण्यात यावी. यासंबंधीचे अध्यादेश पोलिसांनी काढावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या. इतकेच नव्हे तर त्या १०० मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचे अवैध स्वागतपर होर्डिंग लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी कुणी होर्डिंग लावत असतील तर ते काढून टाकावे, असे स्पष्ट आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. येत्या ११ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे होणाऱ्या सोहळ्यानिमित्त प्रशासनातर्फे काय-काय व्यवस्था करण्यात आली आहे, याचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी घेतला. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कुंभारे सभागृहात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, विजय चिकाटे आदी उपस्थित होते. ९ आॅक्टोबर ते १२ आॅक्टोबरपर्यंत या परिसरात पिण्याचे पाणी, साफसफाईची व्यवस्था, औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने, तसेच दळणवळणाची व्यवस्था अत्यंत चोखपणे पूर्ण करा. दीक्षाभूमी वरील नियोजनाच्या कृती आराखड्यानुसार पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात, तसेच या परिसरामध्ये अचानक कुठलीही घटना घडू नये या दृष्टीने अधिसूचना काढून या परिसरात अवैधपणे कुठल्याही काम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तसेच महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दीक्षाभूमी परिसरात व्यवस्थेसंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. स्मारक समितीच्या वतीने तसेच ड्रॅगन पॅलेस येथील व्यवस्थे संदर्भात विविध सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या, त्यानुसार त्वरित कारवाई करावी, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाला निर्देश दिले. पोलीस विभागातर्फे केलेल्या नियोजनाबद्दल पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, राकेश कलासागर यांनी बैठकीत माहिती दिली.(प्रतिनिधी)भोजनदानासाठी परवानगी आवश्यकदीक्षाभूमी परिसरात अन्नदान, भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी फूड झोन तयार करून येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना करताना अन्नदानासाठी अन्न व औषधी प्रशासन व स्मारक समितीची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून अन्नदान करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे. विनापरवानगी कुणीही अन्नदान करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे, तसेच स्मारकतर्फे यावेळी करण्यात आले आहे.पाऊस आल्यास पर्यायी व्यवस्था यात्रा व उत्सव इत्यादीप्रसंगी घ्यावयाच्या दक्षते संदर्भात शासनाच्या सुस्पष्ट सूचना असून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासकीय व खासगी मालकीची खुली जागा अधिग्रहित करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्या. तसेच वादळ किंवा पाऊस आल्यास अनुयायांना थांबण्यासाठी परिसरातील सर्व महानगर पालिकांच्या शाळा, तसेच शासकीय कार्यालयामध्ये पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. व्यवस्थेसंदर्भात प्रशासनाला सहकार्य कराधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांची कुठलीही गैरसोय होणार नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमी, ड्रगन पॅलेस येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून व्यवस्थेसंदर्भात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.१२०० पोलिसांचा बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात येत असून या नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत राहणार असून पोलीस विभागातर्फे सुमारे १२०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.चार दिवस २४ तास वैद्यकीय सुविधा आरोग्य विभागातर्फे तीन मोबाईल दवाखाने सुरू करण्यात येणार असून चार दिवस हृदयविकारापासून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. माताकचेरी परिसरात आठ अॅम्ब्युलन्स, २४ तास वैद्यकीय सुविधा नियंत्रण कक्ष, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रत्येकी १० खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ड्रॅगन पॅलेसमधील स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन ड्रगन पॅलेस येथे १० व ११ असे दोन दिवस कार्यक्रम असून बौद्ध शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ११ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रॅगन पॅलेसला भेट देणार असून १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करतील. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होईल.‘स्टार बस’वर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी स्टार बसबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पैसे कमावण्यासोबतच सेवा देणे हे सुद्धा परिवहनाचे काम आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. कोराडी येथील यात्रेसंदर्भात स्टार बसद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत त्यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसमध्ये अशीच व्यवस्था राहिली तर खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीदही त्यांनी दिली. स्टार बस शहरासाठीच ठीक आहे, ग्रामीण भागात स्टार बस नकोच असेही ते म्हणाले. ‘बुद्धिस्ट सर्किट’चा पहिला विकास आराखडा केंद्रास सादर दीक्षाभूमी, चिचोली आणि ड्रॅगन पॅलेस यांना जोडून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन या योजनेंतर्गत या बुद्धिस्ट सर्किटचा विकास करण्यात येणार आहे. यासंबंधीचा पहिला विकास आराखडा केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: केंद्रीय पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली. त्यामुळे या विकास आराखड्यास लवकरच केंद्राची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.
१०० मीटर परिसरात भोजनदानास बंदी
By admin | Published: October 02, 2016 3:08 AM