लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि केंद्रीय कृषी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला नागपुरात संमिश्र तर ग्रामीणमध्ये मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरामध्ये सौम्य आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या तुलनेत ग्रामीण भागामध्ये आंदोलनात शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधलेली दिसली. या धूमश्चक्रीतही नागपूर शहर मात्र दिवसभर ट्रॅकवरच होते. तर ग्रामीण क्षेत्रामध्ये आंदोलनावर नियंत्रण राखण्यासाठी यंत्रणेला बरीच पळापळ करावी लागलेली दिसली.
शहरात संविधान चौक, ऑटोमोटिव्ह चौक हे मंगळवारी दिवसभ आंदोलनाचे केंद्र होते. विविध आंदोलकांनी आणि बंदला पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी येथे एकत्रित येऊन घोषणाबाजी केली. शहरातही या संपाला व्यापक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा गृहीत धरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त स्वत: प्रयत्नशील होते. बंदच्या पूर्वसंध्येला त्यांनी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय पक्ष, संघटना, आणि संपकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थकांनी हा बंद शांततेत पार पाडला.
बाजार समित्यांंचा संपूर्ण पाठिंबा या बंदला दर्शविण्यात आला होता. त्याचा परिणाम पडला. वाहतूकदार संपात असल्याने मालाची आवक झाली नाही. शहरातील धान्य बाजारपेठा मात्र आज दुपारपर्यंत बंद होत्या. भाजीबाजार सुरळीत होता. शहरातील धान्य मार्केट बंद होते, परंतु किराणा बाजारपेठा सुरू होत्या. कळमना मार्केट, इतवारी, महाल, बर्डी, सराफा बाजारही सुरळीत सुरू होता. संत्रा बाजारावरही फारसा परिणाम जाणवला नाही. कळमना मार्केटमधील आवकही सुरू होती.
नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून बंदमध्ये शांततेत समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांकडून बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात होते. कोराडी नाका चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. वाहतूक सुरळीत सुरू होती. शहरातील सर्व सेवाही रोजच्या प्रमाणेच सुरू असल्याने संपाचा दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम पडल्याचे जाणवले नाही.
...
ऑटोमोटिव्ह चौकात तगडा बंदोबस्त
ऑटोमोटिव्ह चौकामध्ये विविध संघटनांनी आंदोलन केले. शीख समुदायाच्या लोकांनी केलेले आंदोलन व्यापक स्वरूपाचे होते. त्यात तरुणांचाही लक्षणीय सहभाग होता. निदर्शने, घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. यामुळे पोलिसांवरचा ताणही येथे कायम होता. अन्य संघटनांनीही येथे निदर्शने केली.
...