लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले. सोमवारी बेंगळुरू येथे मुसळधार पाऊस आणि रन-वे क्लोजरमुळे उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल आठ तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गो एअरचे सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणारे विमान रात्री नागपुरात पार्किंगला असते.नागपूर-मुंबई विमान भोपाळमार्गेएअर इंडियाचे नागपूर-मुंबई विमान एआय-६२७ चार दिवस भोपाळमार्गे जाणार आहे, पण प्रवाशांना नागपूर ते भोपाळकरिता तिकीट देणे बंद आहे. तसेच मुंबईहून नागपूरला येणाऱ्या याच विमानात भोपाळला जाण्याकरिता मुंबईतच भोपाळकरिता बुकिंग देण्यात आले.एअर इंडियाचे विमान नागपुरातून मुंबईकडे सकाळी ८ वाजता जाते. पण सध्या चार दिवस थेट मुंबईला न जाता भोपाळमार्गे जाणार आहे. हे विमान ४५ मिनिटात भोपाळला पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ प्रवास करावा लागत आहे. हज यात्रेकरिता शेड्युलची तयारी आणि काही विमाने ग्राऊंड असल्यामुळे कंपनीला अशी कवायत करावी लागत असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली.
बेंगळुरू धावपट्टी बंद, नागपुरात विमान आठ तास अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 9:52 PM