कमलेश वानखेडे
नागपूर : आंबट गोड चवीसाठी नागपूर-विदर्भातील संत्रा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून प्रती किलो तब्बल ६३ रुपये केले आहे. याचा जबर फटका निर्यातीला बसला असून, यामुळे संत्र्यांची उचल कमी झाली आहे. परिणामी संत्र्याचे भाव गडगडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात २५ ते ४० हजार रुपये प्रती टनाने विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे भाव २० ते २५ हजार रुपये टनांपर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसतो आहे.
विदर्भातील वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो. विदर्भातील एकूण संत्रा उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. गेल्यावर्षी विदर्भातील दररोज सुमारे २०० ट्रक संत्र्याची बांग्लादेशला निर्यात व्हायची. एका ट्रॅकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्रा असतो. गेल्यावर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्यात आला. मात्र, यावर्षी बांगलादेशकडून संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ५१ रुपये प्रती किलो असलेले आयात शुल्क यावर्षी वाढवून ६३ रुपये करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत आयात शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून संत्र्याची उचल कमी झाली असून, दररोज जेमतेम २० ते २५ ट्रकच माल निर्यात केला जात आहे. यामुळे संत्र्यांचे भाव गडगडले आहेत.
देशांतर्गत साठा वाढला, भाव पडले
- विदर्भातील संत्रा नागपुरातील कळमना मार्केटसह कोलकाता, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, बंगलोरमध्ये विकला जातो. मात्र, निर्यात कमी झाल्याने या देशांतर्गत बाजारपेठांमध्येही संत्र्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गतही संत्र्यांची उचल घटली आहे. परिणामी भाव टनामागे १५ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत.
केंद्र सरकारने दखल घ्यावी
- गेल्या तीन वर्षांत बांगलादेशने संत्र्यांवरील आयात शुल्क तिप्पट केले. यावर्षी ऐन हंगामात पुन्हा वाढ केली. याचा परिणाम निर्यातीवर होत असून, संत्र्याचे भाव गडगडले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे संत्रा गळाला. उत्पादन घटले. आता वाढीव आयात शुल्कामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांवर दुहेरी मार पडत आहे. केंद्र सरकारने त्वरित याची दखल घेत बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे.
- मनोज जवंजाळ
- संचालक, महाऑरेंज
बांगलादेशने असे वाढविले आयात शुल्क
२०१९ - २० रुपये
२०२० - ३० रुपये
२०२१ - ५१ रुपये
नोव्हेंबर २०२२ - ६३ रुपये