नागपुरात बिनबोभाट वावर नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात बिनबोभाट वावरणाऱ्या अल्पवयीन मुलासह पाच बांगलादेशी नागरिकांना मंगळवारी गुन्हेशाखेच्या पथकाने जेरबंद केले. मोहम्मद अब्दुल हसन (वय ४५) मोहम्मद आमिनूर हसन (वय २१), रबीउल हसन (वय ४०) समिउल हसन (वय २१) आणि अन्य एका अल्पवयीन मुलाचा पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरात समावेश आहे. हे पाचही जण गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून फळ विक्री करतात. मोमिनपुरा परिसरात ते भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. गुन्हेशाखेच्या पथकाला ते बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती कळाली. शहानिशा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पथकाने उपरोक्त पाच जणांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता कॉटन मार्केट परिसरातून ताब्यात घेतले.यातील काही जण आठ ते दहा वर्षांपासून नागपुरात वास्तव्याला आहे. भारतात घुसखोरी केल्यानंतर ते कोलकाता मार्गाने नागपुरात आल्याची माहिती आहे. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना सायंकाळी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, नागपुरात शेकडो बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य आहे. वेळोवेळी अनेक घटनांमधून ते स्पष्टही झाले आहे. २००६ मध्ये पोलीस उपायुक्त प्रभातकुमार यांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १०८ बांगलादेशी घुसखोरांना पकडले होते.
बांगलादेशी घुसखोर जेरबंद
By admin | Published: October 28, 2015 3:09 AM