लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर बंजारा समाज नाराज असून, याविरुद्ध राज्यभरात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
भालचंद्र नेमाडे यांना २०१० साली प्रकाशित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीसाठी २०१५ साली साहित्य अकादमीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कादंबरीत हरिपुरा या लभान अर्थात बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन केले असून, त्यात समाजातील स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व बीभत्स स्वरूपाचे वर्णन करण्यात आल्याचा आरोप समाजाच्या साहित्यिकांनी व नेत्यांनी लावला आहे. शिवाय, ही कादंबरी त्रिखंडात्मक असल्याचा पुकारा करणाऱ्या नेमाडे यांच्या या अपूर्ण कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर कसा होतो, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे, नेमाडे व कादंबरीचे प्रकाशक यांच्यावर सामाजिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून कारवाई करा आणि ज्ञानपीठ पुरस्कार परत करा अशी मागणी केली जात आहे. याबाबत शुक्रवारी २२ जानेवारीला एकाच वेळी राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
* हा समाजाचा अपमान आहे. एवढ्या नामांकित साहित्यिकाने महिलांविषयी असले लिखाण करणे नामुष्कीचे आहे. या कादंबरीवर शासनाने बंदी आणावी, लेखक व प्रकाशकावर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
- प्रा. गणेश चव्हाण, प्रसिद्ध साहित्यिक
..........