फरारीमध्ये नागपूरला आला होता बंजारा : तपास अधिकारी दोषी असल्याचा पीडितांचा आरोप
नागपूर : अनेक शहरात एजन्सी चालवून कोट्यवधींनी फसवणूक करणारा सुभाष बंजारा फरार असताना अनेकदा कुटुंबीयांना भेटण्यासाठी नागपूरला आला होता. त्याची माहिती कळताच सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंजाराच्या अटकेसाठी काहीच केले नाही. बंजाराचे कृत्य समोर आल्यानंतर पीडीत पोलिसांना दोषी मानत आहेत.
‘लोकमत’ने बंजाराच्या दिल्लीतील वजीरपूरमध्ये २ हजार टॅक्सी चालकांना १२ ते १३ कोटींचा चुना लावून फरार झाल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नागपुरातील पीडित सदर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना दोषी ठरवीत आहेत. बंजाराच्या विरुद्ध १४ सप्टेंबरला सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे तो दिल्लीतही नागपूरच्या धर्तीवर फसवणूक करून फरार झाला. बंजाराची सासूरवाडी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड आहे. बंजारा कुटुंबीयांसोबत पूर्वी कळमन्यात राहत होता. त्यानंतर तो पोलीस लाईन टाकळीतील कामगारनगरात राहण्यासाठी आला. नागपुरातील पीडितांनी बंजारासोबत त्याच्या कुटुंबीयांचाही फसवणुकीत हात असल्याची शंका व्यक्त केली होती. परंतु पोलिसांनी बंजारासोबत मधूर संबंध असल्यामुळे कुटुंबीयांना आरोपी केले नाही. पीडितांनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही तपास अधिकाऱ्यांची भूमिका बदलली नाही. सदरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बंजाराच्या कुटुंबीयांनी नागपुरातून फरार होण्याची तयारी केली. ऐनवेळी त्याची माहिती पीडितांनी मिळाली. त्यांनी कामगारनगरात पोहोचून सदर पोलिसांना त्याची सूचना दिली. सदर पोलिसांनी पीडितांची काहीच मदत केली नाही. त्याचा लाभ घेऊन बंजाराच्या कुुटुंबीयांनी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. गिट्टीखदान पोलिसांनी पीडितांना दमदाटी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस बंजाराच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या वाहनातून सामानासह सोडण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत गेले होते. पोलिसांचे संरक्षण असल्यामुळे बंजारा नागपुरातही आला होता. येथून मुले आणि कुटुंबीयांना घेऊन दिल्लीला गेला. पीडितांनी बंजारा कुटुंबीयांना सोबत घेऊन जात असल्याची सूचना पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचीही चौकशी केली नाही. पीडित सदरच्या तपास अधिकाऱ्याला दोषी असल्याचे सांगून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करीत आहेत.
..............