लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रे सादर करून इंडियन ओव्हरसीस बँकेकडून १२ आरोपींनी पावणेतीन कोटी रुपयांचे कर्ज लाटून फसवणूक केली. कर्जाची रक्कम थकीत झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी बँक अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. नंतर इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली.शबीना अरशद खान, अरशद हसन खान (दोन्ही रा. पंचशील नगर), शाहीद अहमद जीमल अहमद खान, वसीम अहमद जीमल अहमद खान, वकील जीमल अहमद खान, रानी वसीम अहमद खान (सर्व रा. एकता कॉलनी, यादवनगर), संगीता संजय इटनकर, जयंत धर्मराज इटनकर (दोन्ही रा. पार्वतीनगर), योगेश महादेव वांढरे (शेषनगर, खरबी), शेख गुफान अली, अफसर अजाम अली (दोन्ही रा. सिंदीबन कॉलनी, मोठा ताजबागजवळ) आणि रेहाणा इस्माईल शेख (रा. अजनी रेल्वेक्वॉर्टर) अशी आरोपींची नावे आहेत.या सर्वांनी बैद्यनाथ चौकाजवळच्या इंडियन ओव्हरसीस बँक शाखेतून शुभगृह हाऊसिंग लोन अंतर्गत सदनिका विकत घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. त्यांनी त्यावेळी बनावट कागदपत्रांसह आयकर रिटर्नही सादर केले. विशेष म्हणजे, या कागदपत्रांची फारशी शहानिशा न करता बँक अधिकाºयांनी उपरोक्त १२ आरोपींना २ कोटी, ६३ लाख, ७८ हजार, ६०८ रुपयांचे कर्ज दिले. १३ जुलै २०१५ ते २९ एप्रिल २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला. कर्ज घेतल्यानंतर आरोपींनी हप्ते थकलवल्याने बँक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. कर्ज घेणाऱ्या उपरोक्त आरोपींची कागदपत्रे तपासण्यात आली. चौकशीत ती बनावट असल्याचे उघड झाल्याने बँकेतर्फे देवराव उरकुडाजी मोंदेकर (रा. एकता कॉलनी) यांनी इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. नरवाडे चौकशी करीत आहेत.