लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत पिस्तूल, चाकू घेऊन शिरलेल्या दोन लुटारूंनी आज गुरुवारी दुपारी रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने लुटारूंचा अपेक्षाभंग झाला. दरम्यान, बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना बँकेत डांबून बाहेरून शटर लावून घेत आरोपी रिकाम्या हाताने पळून गेले. गुरुवारी दुपारी १२. ४० ते १ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छोटा ताजबाग परिसरात बँकेची ही शाखा आहे. तेथे फारशी वर्दळ नसते. नेहमीप्रमाणे तेथे अधिकारी कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असताना तोंडावर कापड बांधलेले दोन लुटारू दुपारी १२. ४० च्या सुमारास बँकेत आले. दारावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांना फारसा व्यत्यय आला नाही. त्यांच्या हातात चाकू आणि पिस्तूल होते. बँक अधिकाºयांवर शस्त्र रोखत त्यांना लुटारूंनी रोकड काढून देण्यास सांगितले. मात्र, बँकेत रोकडच नसल्याचे अधिकाऱ्यांनी लुटारूंना सांगितले. पाहिजे तर खात्री करून घ्या, असेही म्हटले. रोखपालाच्या कक्षात खरेच रोकड नसल्याचे लक्षात आल्यामुळे लुटारूंनी शिवीगाळ करून बँकेच्या मुख्य दाराचे शटर लावले आणि अधिकाऱ्यांना आतमध्ये डांबून पळ काढला. बँक अधिकाऱ्यांनी प्रारंभी आपल्या वरिष्ठांना आणि नंतर सक्करदरा पोलिसांना कळविले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा शोध घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत होते.---