लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पिपळा (किनखेडे, ता. कळमेश्वर) येथील इंडियन ओव्हरसीज बॅंकेची शाखा धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथे स्थानांतरित करण्यात आली. त्यामुळे पिपळा (किनखेडे)सह परिसरातील आठ गावांमधील शेतकरी व इतर नागरिकांचे आर्थिक व्यवहार अडचणीत आले आहेत. हे व्यवहार करण्यासाठी या गावांमधील नागरिकांना आता सात ते आठ कि.मी.ची पायपीट करावी लागणार आहे.
पिपळा (किनखेडे) येथे २०१५ साली इंडियन ओव्हरसीज बॅंकेची शाखा सुरू करण्यात आली हाेती. त्यामुळे स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांंसह नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. या शाखेत पिपळा (किनखेडे), कन्याडोल, कोकर्डा, मडासावंगी, वाढोणा (खुर्द), परसोडी, मोहगाव, पानउबाळी या गावांमधील शेतकऱ्यांची खाती आहेत. ते याच बॅंकेच्या शाखेतून पीक व इतर कर्जाची उचल व परतफेड करण्यासाेबत सर्व आर्थिक व्यवहार करायचे. त्यामुळे या बॅंकेची आर्थिक उलाढालही बऱ्यापैकी आहे.
दरम्यान, ही शाखा धापेवाडा येथे स्थानांतरित करण्यात आली आहे. पिपळा (किनखेडे) येथे आता काेणत्याही बॅंकेची शाखा नसल्याने येथील व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक व शासकीय याेजनांच्या लाभार्थ्यांना धापेवाडा किंवा माेहपा (ता. कळमेश्वर) येथील बॅंक शाखांसाेबत आर्थिक व्यवहार करावे लागणार असून, त्यासाठी त्यांना सात ते आठ कि.मी.ची पायपीट करावी लागणार आहे.
....
खाती बंद करण्याची धावपळ
इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या पिपळा (किनखेडे) शाखेत ४,५०० पेक्षा अधिक बॅंकखाती आहेत. त्यात शेतकऱ्यांसह इतर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, शासनाच्या विविध याेजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. ही शाखा स्थानांतरित केली जात असल्याची माहिती मिळताच खातेदारांनी त्यांची खाती बंद करून रक्कम परत घेण्यासाठी बॅंकेत रांगा लावल्या हाेत्या. दुसरीकडे बॅंक व्यवस्थापन खाती बंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आराेपही खातेदारांनी केला.
...
एकाच गावात दाेन शाखा
धापेवाडा येथे आधीच बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. इंडियन ओव्हरसीज बॅंकेची शाखा धापेवाडा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तिथे आता दाेन बॅंकांच्या शाखा हाेणार असून, पिपळा (किनखेडे) येथे आता एकही बॅंक शाखा नसणार. त्यामुळे या भागातील बॅंक खातेदारांची अडचण हाेणार आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी पिपळा (किनखेडे) येथे दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा तातडीने सुरू करण्यात यावी अथवा इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या शाखेचे स्थानांतरण थांबवावे, अशी मागणी सरपंच शिल्पा वानखेडे, उपसरपंच प्रशांत कापसे, अमोल फुलारे, अशोक तरारे, वंदना सेवतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.