लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. आज गुरुवारी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार उद्या शुक्रवारपासून सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमितपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू राहतील. ग्राहकांकरिता बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची राहील.केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे पैसे सद्यस्थितीत जमा झालेले आहेत, त्यामुळे गर्दी होऊ नये. म्हणून बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता ४-४ फुटांच्या अंतरावर सर्कल्स मार्किंग करावेत. त्यानुसार ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पाणी इत्यादींची व्यवस्था बँकेतर्फे करावी. बँकेच्या दर्शनी भागावर कोरोना जनजागृती, उपाययोजनासंबंधीचे होर्डिंग्ज लावणे बंधनकारक राहील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम देण्याची व्यवस्था करावी, परंतु प्रतिनिधी निवडताना त्यास ताप, खोकला असू नये, तसेच ती व्यक्ती हॉटस्पॉटमधील नसावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बँका आजपासून नियमित सुरू राहणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:25 PM
लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देबँक प्रतिनिधींची घेतली बैठक