नागपूर : सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात एआयबीईए, एआयबीओए आणि बीईएफआयच्या बॅनरखाली हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे.
खासगीकरण हा सरकारचा मुख्य अजेंडा असून, त्यात बँकिंगसह अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्राचा समावेश आहे. सरकारने सध्याचे कामगार कायदे आणि संहिता रद्द करून त्याचे विलीनीकरण चार श्रम कायद्यामध्ये केले आहे. त्यापैकी बरेच कायदे कामगारविरोधी आहे. प्रदर्शनाचे नेतृत्व ईएमबीईएचे चंडिल अय्यर, अशोक अतकरे यांनी केले.
ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बोभाटे म्हणाले, बँकिंग क्षेत्राची सार्वजनिक क्षेत्रातील स्थिती कमकुवत करण्याच्या दिशेने सरकारच्या बहुआयामी निर्णयाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांची चळवळ तीन दशकांहून अधिक काळ जोरदारपणे लढत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मोठ्या प्रमाणात एनपीएचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये कॉर्पोरेट्सचा मोठा वाटा आहे.
भागभांडवल शेअर बाजारात विकू नका !
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपामुळे, भारतीय आयुर्विमा महामंडळातील सेवा विस्कळीत व कामकाज ठप्प झाल्यामुळे हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी सोमवारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मुख्यालयासमोरील द्वारसभेत केला.
या प्रसंगी आयुर्विमा कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. संपामुळे रोखीच्या व्यवहारासह सर्व सेवा ठप्प झाल्याने विभागीय कार्यालयात व शाखा कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेअर बाजारात विकू नका, सार्वजनिक क्षेत्र मजबूत करा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करा, मालकहिताचे व कामगारविरोधी कायदे रद्द करा, रोजगाराचे कंत्राटीकरण त्वरित थांबवा, कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळविलेले अधिकार संपुष्टात आणणारे चार लेबर कोड बिल आणि एलआयसीमध्ये त्वरित नोकरभरती सुरू करा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता व जनतेच्या हिताचे रक्षण करण्याकरिता विमा कामगारांनी हा संप पुकारल्याची माहिती कामगार नेते अनिल ढोकपांडे यांनी दिली.
इन्शुरन्सचे उपक्रम खासगी क्षेत्राच्या घशात कशाला?
सार्वजनिक विमा कंपनीमध्ये कार्यरत जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज ऑल इंडिया असोसिएशन ॲण्ड ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन अंतर्गत वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शंकरनगर चौकातील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प होते.
श्रम कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांचे समर्थन करताना त्यांनी दोन दिवसाच्या संपाचे समर्थन केले. पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुळकर्णी यांनी सरकार सार्वजनिक क्षेत्राला संपुष्टात आणत असल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांनी संविधान चौकातील प्रदर्शनात भाग घेतला. संचालन रोहित शिवहरे यांनी केले. आयोजनात विमा कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.