नागपूर : नायलॉन मांजामुळे पुन्हा एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सक्करदरा परिसरातून पायी जात असताना तिच्या पायात मांजा अडकला. मांजा काढत असतानाच एक वाहन बाजूला जात होते. त्यात मांजा गुंतला अन् तरुणीच्या पायाचे हाडच या मांजाने कापले. आठवडाभरात मांजाने शहरातील तीन जण जखमी झाले आहेत. यात एका ७ वर्षाच्या चिमुकलीचा गळा कापला होता.
मांजामुळे पायाचे हाड कापलेल्या तरुणीचे नाव मोसमी मोरेश्वर रहांगडाले आहे. ती सक्करदरा येथे राहते व श्री हॉस्पिटलमध्ये सीआरसी या पदावर काम करते. सकाळी हॉस्पिटलमध्ये मैत्रिणीसोबत ती जात होती. दरम्यान, मोसमीच्या पायात नायलॉन मांजा अडकला. पायातून मांजा काढत असतानाच बाजूला एक चारचाकी वाहन जात होते. या वाहनात मांजा फसला आणि जोरदार ओढला गेला. त्यामुळे तिच्या पायाला चांगलाच काप बसला. पाय रक्तबंबाळ झाला.
मैत्रिणींनी लगेच तिला रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांना तिच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. मांजामुळे पायाचे हाड कापला गेल्याचे मोसमीने सांगितले. डॉक्टरांनी तिला तीन महिन्यासाठी बेडरेस्ट सांगितली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोसमीकडून घटनेची माहिती घेतली. मांजामुळे दररोज गळेकापी, पायकापी सुरू आहे. यावर लवकरच प्रशासनाने निर्बंध घातले पाहिजे. या मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा हा मांजा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना मोसमी रहांगडाले हिने व्यक्त केली.
नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवरही गुन्हा
मकर संक्रांतीच्या तोंडावर नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, अनेक विक्रेत्यांवर धाडी पडल्या आहेत. नायलॉन मांजाचा उपयोग करून पतंग उडविणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २१ वर्षीय तरुणाला पतंग उडविताना पकडून ताब्यात घेण्यात आले.
अंकित चंद्रशेखर पांडे (२१, योगी अरविंदनगर) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. तो ग्रामीण आरटीओच्या मोकळ्या मैदानात पतंग उडवत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांचे पथक पोहोचले असता, तो नायलॉन मांजाचा उपयोग करून पतंग उडवत होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील पतंगबाजांमध्ये खळबळ उडाली.