नागपूर : औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. गुळवेल, मटारु, काटेमोड, आघाडा, केना, अंबाडी आदी ग्रामीण भागात उगवणाऱ्या रानभाज्या शहरी नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात या उद्देशाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसीय या महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्यवर्धक या रानभाज्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषी विभाग, ‘आत्मा’ तसेच ‘उमेद’ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाजी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बचत गट तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले असून यात गुळवेल, मटारू, भुई आवळा, राई भाजी, कपाळ- फोळी, रताळे, काटेमोड, आघाडा, केना, तरोडा, अंबाडी, दिंडी या भाज्यांचा समावेश असून या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस् ॲटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यात मदत करतात. तसेच मधुमेह, त्वचेची समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. राई ही भाजी कफ-पित्तदोष रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासाठी उपयुक्त आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सैाम्या शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, उमेदच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर उपस्थित होते.
माहिती पुस्तिकेचे विमोचन
नागपूर जिल्ह्यात उपलबध असलेल्या विविध रानभाजया संदर्भातील माहिती तसेच त्याची उपयुक्तता आदी माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले.