लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमानात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. रणरणत्या उन्हात फिरताना जीव कासावीस होतो व माणूस सावलीसाठी धडपडत असतो. अशा ४५ डिग्री तापमानात चपला न घालता घराच्या अंगणात जरी जा म्हटले तरी कुणाचाही तीळपापड होईल. विचार करा, अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे गप्प बसण्यापेक्षा भर उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्यांसाठी ते चप्पल देणारे दूत म्हणून सेवा देऊ लागले.सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष अटलोए, पीएसआय कैलास कुथे, अजित शाह आणि लाचलुचपत विभागातील एक वरिष्ठ अधिकारी यांनी अशा वंचित घटकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात ही मोहीमच सुरू केली आहे. विविध ठिकाणी अनवाणी पायाने रखरखते उन सहन करून जगण्याची लढाई लढणारे अनेक बेवारस, निराधार, वंचित घटक व मनोरुग्ण बांधव फिरताना आपल्या नजरेस पडतात. एकीकडे गगनचुंबी इमारतीमध्ये विलासी आयुष्य जगणारे तर दुसरीकडे नशिबात आलेल्या दारिद्र्याचे चटके सहन करणारे हे वंचित घटक. या चार सहकाऱ्यांना या दैनावस्थेकडे दुर्लक्ष करणे शक्य झाले नाही. या वंचितांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालता यावी म्हणून भरदुपारी शहरातील रस्त्यांवर अनवाणी पायाने फिरणाऱ्यांना नवीन चप्पल, दुपट्टे, टोपी आणि थंड पाणी देण्याचे सेवाभावी काम त्यांनी सुरू केले.या चौघा सहकाऱ्यांपैकी कुणीही दररोज दुपारी १ ते ४ वाजताच्या दरम्यान अशा निराधारांना शोधत शहरातील रस्त्यांवर फिरतात. आज हा परिसर तर उद्या दुसरा. गाडीत आवश्यक ते वाटपाचे साहित्य टाकून रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिरे, वस्त्या, रस्ते, उद्याने असे सर्व हे सहकारी पिंजून काढत आहेत. गरीब असो, भिकारी असो की मनोरुग्ण असो, अशा पायात चप्पल नसलेल्या सर्वांना चप्पल देण्याचे काम ते करतात. सोबत दुपट्टा, तहान लागली तर पाणी आणि भूक लागली तर खाद्य देण्याचेही काम केले जाते. डॉ. अटलोए सांगतात, गेल्या तीन वर्षापासून उन्हाळा सुरू झाला की आमची मोहीम सुरू होते. यावर्षी आतापर्यंत ९५ लोकांना आम्ही चप्पल व इतर साहित्य दिले आहे.अशीही सामाजिक बांधिलकीकेवळ चप्पल वितरणाचेच काम नाही तर कडाक्याच्या थंडीत अशा गरीब, निराधार व बेवारस लोकांना ब्लँकेट वाटपाचे कामही डॉ. अटलोए करीत असतात. गेल्या पाच वर्षापासून ब्लँकेट देण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. रात्री रस्त्यावर फिरायचे व थंडीत कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर ब्लँकेट घालायचे. यामुळे त्यांना ब्लँकेट दूतही म्हटले जाते. याशिवाय पावसाळ्यात छत्र्या, गरिबांच्या घरांसाठी ताडपत्री, पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. यासोबतच गरजवंतांना शासकीय योजनेतून वैद्यकीय मदत मिळवून देणे, योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करणे हे त्यांचे नित्याचे काम. स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेले आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवित आहेत. भिकाऱ्यांना रोजगारासाठी राबविणार उपक्रमरोजगार मिळवून स्वाभिमानाने जगण्याची इच्छा बाळगणाऱ्यां निराधार व भिकाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार डॉ. अटलोए यांनी केला आहे. छत्र हिरावलेले निराधार व रोजगाराची इच्छा बाळगणाऱ्या भिकाऱ्यांना वजनकाटा देणे, मंदिरासमोर फुले, तेल किंवा इतर आवश्यक साहित्याची दुकाने लावून देण्यास मदत करणार असल्याचे सांगत आजपासूनच ही मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनवाणी पायांसाठी ते झाले ‘चप्पलदूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:32 AM
अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे गप्प बसण्यापेक्षा भर उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्यांसाठी ते चप्पल देणारे दूत म्हणून सेवा देऊ लागले.
ठळक मुद्देबेवारस, निराधार, वंचितांना आधार : दुपट्टे, टोपी व पाण्याचेही वितरण