लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालय परिसरात लागणाऱ्या लांबलचक रांगांमधून मुक्ती मिळावी आणि वाहनचालकांचा त्रास वाचावा, यासाठी परिवहन विभागाने ऑनलाइन लायसन्स सेवा सुरू केली. असे असले तरी डिजिटल पेमेंटच पोहोचत नसल्याने पुढची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. यामुळे ऑनलाइन लायसन्स मिळवू पाहणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडल्यासारखी स्थिती झाली आहे.
आता लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही, असे या प्रक्रियेत सांगण्यात आले होते. या विभागाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा, आधार क्रमांक टाकायचा, तो लिंक होताच संबंधित वाहन चालकाची सारी कागदपत्रे आरटीओ अधिकाऱ्याला मिळत असल्याने वेगळी कागदपत्रे देण्याची गरज नाही.
अर्ज दाखल केल्यावर लर्निंग लायन्ससो शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीनेच द्यायचे असते. यानंतर १५ प्रश्नांची एक ऑनलाइन चाचणी घेतली जाते. यात ७५ टक्क्यांवर गुण मिळविणाऱ्यांना तत्काळ ऑनलाइन लायसन्स दिले जाते. ही योजना चांगली असली तरी डिजिटल पेमेंट हा अडचणीचा मुद्दा बनला आहे. अनेक वाहनचालकांनी मोबाइल ॲप अथवा यूपीआयच्या माध्यमातून शुल्क जमा केली, मात्र ती जमा झालीच नाही. यामुळे अनेकांना परीक्षाच देता आली नाही. या संदर्भात आरटीओ कार्यालयांकडे तक्रारी झाल्या. परंतु प्रकरण सर्व्हरशी संबंधित असल्याने तांत्रिक विभागाला यासंदर्भात कळविण्यात आले आहे. हा दोष दूर झाल्यावरच वाहनचालकांना ऑनलाइन लायसन्स मिळणार आहेत. मात्र एका दिवसात लायसन्स मिळण्याच्या दाव्यावर सध्यातरी पाणी फेरले आहेत.
...
कोट
ऑनलाइन लायसन्स प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद आहे. मात्र अचानकपणे तांत्रिक दोष आला आहे. डिजिटल पेमेंटसंदर्भात तक्रारी आहेत. संबंधित विभागाला या संदर्भात कळविले आहे. हा दोष दूर होईपर्यंत वाहनधारकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.
- स्नेहा मेंढे, सहायक आरटीओ
...