मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : बॅ. शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळानागपूर : अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १० वर्षे सादर करणाऱ्या बॅरिस्टर वानखेडे यांनी प्रत्येक अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला विकासाकडे नेले. काही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. नागपूरचे सुपुत्र असणाऱ्या वानखेडे यांनी मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधले. त्याच स्टेडियममध्ये माझ्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी मला अनुभवता आला. राजकारण, समाजकारण, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात प्राविण्य प्राप्त असणारे बॅरिस्टर वानखेडे खऱ्या अर्थाने अष्टपैलू होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले. बॅरि. शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तर प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ खेळाडू चंदू बोर्डे, कुंदाताई विजयकर, रमोला महाजनी, आ. सुनील केदार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, बॅरि. वानखेडे यांनी केलेल्या यशस्वी कामांचा वारसा पुढे कुंदाताई विजयकर, रमोला महाजनी यांनी तितक्याच सार्थपणे चालू ठेवला आहे. बॅरि. वानखेडे यांचे जीवन कृतार्थ आहे. असे लोक एखाद्या संस्थेसारखे असतात आणि ती इतरांचे जगणेही समृद्ध करून जातात, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा दिवस आहे. आयुष्यात काही सोन्यासारखी माणसे येतात आणि ती अखंड स्मरणात राहतात, असेच बॅरि. वानखेडे होते. मी ४८ वर्षांपूर्वी विधानसभेत गेलो तेव्हा नानासाहेब अर्थमंत्री होते.काम कसे करावे, याची दृष्टी त्यांच्याकडून मिळाली. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे काही निर्णय वादग्रस्त असले तरी राज्याचा महसूल वाढविणारे होते. त्यानंतर त्यांचेच मॉडेल अनेक राज्यांनीही महसूल वाढीसाठी वापरले. वातावरण तप्तच झाले की एखादा विनोद करून ते वातावरण हलके करायचे. विरोधकांनी एकदा विधानसभेत हे सरकार नपुंसक आहे, असा आरोप केला. वातावरण संतप्त झाले. त्यावेळी विरोधकांचे म्हणणे कुणीही वैयक्तिक घेऊ नये, असे विधान करून त्यांनी वातावरण शांत केले होते, असे पवार म्हणाले. याप्रसंगी चंदू बोर्डे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी बॅ. वानखेडे यांनी केलल्या कार्याला उजाळा दिला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, बॅ. वानखेडे म्हणजे रॉयल माणूस होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे ‘फुटबॉल प्लेअर आॅफ द इअर’ हा पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू करण्याची घोषणा यावेळी पटेल यांनी केली. याप्रसंगी किशन शर्मा, बीसीसीआयचे जनरल मॅनेजर रत्नाकर शेट्टी, जयंत घाटे यांनीही वानखेडे यांच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक कुंदाताई विजयकर, संचालन रेणुका देशकर, आभार रमोला महाजनी यांनी मानले. कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते ‘शेष स्मृती’ या सुधीर पाठक संपादित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)बॅ. वानखेडे विनोदी स्वभावाचे - पवार वानखेडे नर्मविनोदी होते. एकदा वन विभागात संजय गांधी उद्यानात दोन सिंहिणी आणल्या होत्या. त्या पाहण्यासाठी मी त्यांच्यासह गेलो. त्यांची नावे नर्गिस आणि मधुबाला होती. दोघीही सारख्याच दिसत असल्याने यातील नर्गिस कोण आणि मधुबाला कशी ओळखायची, असा प्रश्न मी केला. यावर नानासाहेब म्हणाले, त्याची आपल्याला काहीच गरज नाही. सिंह दोघींनाही चांगला ओळखतो, अशी आठवण यावेळी पवार यांनी सांगितली. रेसकोर्सच्या संदर्भात काही समस्या होत्या. त्यावेळी मला काहीही अभ्यास नव्हता. नानासाहेब रेसकोर्सवर मला घेऊन गेले आणि माझ्या नावाने ५ रुपयांची शर्यत लावली. त्यानंतर मला त्याचे ५५ रुपये मिळाले. एखादा प्रश्न समजून घेताना त्यात घुसले पाहिजे, ही शिकवण त्यांनी दिली, असे पवार म्हणाले.
बॅरिस्टर वानखेडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते
By admin | Published: September 25, 2015 3:53 AM