नागपूर : आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे येत्या २५ सप्टेंबरपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव राबविण्यात येणार आहे. अतिशय व्यापक आणि राष्ट्रीय स्तरावर हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय नियोजन सभेत घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात होते. तर ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. अशोक गोडघाटे, आंबेडकरी साहित्यिक व समीक्षक ताराचंद खांडेकर, कवी इ.मो. नारनवरे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य भदंत नाग दीपंकर आणि माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘संविधान संवर्धन शिखर परिषद’च्या आयोजनाने या जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ होणार असून या परिषदेत राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनातज्ञ, संशोधक आणि विचारवंत सहभागी होतील. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे तसेच रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेणारा गौरव ग्रंथ आणि स्मरणिका प्रकाशित करण्याचेही निश्चित करण्यात आले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान यांच्या पालकत्वाखाली आयोजित होणाऱ्या या जन्मशताब्दी महोत्सवात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून या महोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येतील.प्रास्ताविक एन.टी. मेश्राम यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी केले. अशोक कोल्हटकर यांनी आभार मानले.