नागपूर : समाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे हे अधिकारी कर्मचारी हे समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स करत असल्याची चित्रफीत व्हायरल होत आहे.
बार्टीच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असताना, बार्टीच्या महासंचालकांकडून प्रशिक्षणाऐवजी गाण्यावर बेभान नृत्य केल्याची चित्रफीत सर्वत्र फिरत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून आलेल्या समतादुतांनादेखील बेभान डान्स करायला लावल्याचे यात दिसत आहे.
समतादुतांच्या या कार्यशाळेचा उद्देश त्यांना भारतीय संविधानांचा अभ्यास आणि महामानवांच्या विचाराने त्यांना प्रेरित करून प्रशिक्षित करणे हा होता. मात्र या विभागात मनमानी सुरू असून, त्याचाच कित्ता महासंचालकांनी गिरवत, बेभान डान्स केल्याचे समोर आल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक न्याय विभागावर आता कुणाचा वचक राहिला नसल्यानेच असे प्रकार होत असल्याने मुख्यमंत्र्यांनीच याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना आंबेडकरी समाजाकडून व्यक्त केली जात आहे.