लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे अशोक, अॅड. आनंद आणि डॉ. सुधीर अशी तीन मुले आणि मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.१४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील ज्या पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मदीक्षा घडविली. त्या दीक्षा समारंभाची संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळेस ते नागपूरचे उपमहापौर होते. त्या पहिल्या ऐतिहासिक सोहळ्यापासून ते स्मारक समितीचे कार्यवाह म्हणून दीक्षाभूमीवरील संपूर्ण जबाबदारी ते सक्षमतेने पार पाडत होते. त्यामुळेच दीक्षाभूमीचे ते खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते. १ नोव्हेंबर १९२८ रोजी एका श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात धरमपेठ येथे त्यांचा जन्म झाला. वडील श्रीमंत मालगुजार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बाळकडू त्यांना लहानपणापासून कुटुंबातूनच मिळाले. १९४२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. नागपूरला अधिवेशन झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली.१९४६ साली न्यू इंग्लिश हायस्कूल सीताबर्डी नागपूर येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर प्रथम मॉरिस कॉलेज आणि नंतर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते बी.ए. झाले.
दीक्षाभूमीचा आधारवड कोसळला ; सदानंद फुलझेले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:24 AM