दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांना स्वादिष्ट नाश्ता, भोजन माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचनचे आधुनिकीकरण करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) अंतर्गत हे काम डिसेंबर २०१९ मध्ये सुरु करण्यात आले. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे या कामाला सुरुवात झाली असून लवकरच अत्याधुनिक ‘मॉडर्न बेस किचन’ प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
भारतीय रेल्वेत विविध विभाग आहेत. प्रवासी सुविधांची जबाबदारी रेल्वेकडे तर कॅटरिंग आणि टुरिझम विभागाकडे ऑनलाईन तिकीट आणि खाद्यपदार्थांची जबाबदारी आहे. आधी बेस किचनची जबाबदारी रेल्वेकडे होती. परंतु नंतर रेल्वे बोर्डाने बेस किचनचा ताबा आयआरसीटीसीकडे दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बेस किचनच्या आधुनिकीकरणाचे काम आयआरसीटीसीने सुरू केले. डिसेंबर २०१९ मध्ये हे काम सुरु झाले. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे होते. परंतु कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे हे काम बंद पडले.
बेस किचनचे काम करणारे मजूर आपापल्या राज्यात निघून गेले. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे आता नव्याने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वर्ष अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. बेस किचनचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना स्वस्त दरात नाश्ता, भोजन उपलब्ध होणार आहे. बेस किचनमध्ये भोजन तयार करण्यासाठी कुकिंग आणि पाकिटे तयार करण्यासाठी पॅकिंग विभाग वेगवेगळे करण्यात येत आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांची तयारी करण्यासाठी ‘प्रीपरेशन’ विभाग आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेगवेगळे विभाग तयार करण्यात येत आहेत. बाहेरील व्यक्तींना बेस किचनमध्ये प्रवेश नसणार असून भोजन तयार करताना स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे.
बेस किचन लवकरच प्रवाशांच्या सेवेत‘डिसेंबर २०१९ पासून बेस किचनच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. वर्ष अखेरीस हे काम पूर्ण होऊन बेस किचन प्रवाशांना सेवा देणार आहे.’-आर सिद्दिकी, विभागीय व्यवस्थापक, आयआरसीटीसी