बाबा टेकाडे
सावनेर : मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला विशेष महत्त्व आहे. हत्तीसरा (ता. सावनेर) येथील स्मशानभूमीत नवीन दहन शेडची निर्मिती करण्यात आली. मात्र, या स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव तसेच नागरिकांचे हाल हाेत असल्याने येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी गावापासून दाेन किमी अंतरावर असलेल्या नांदाेरी (ता. सावनेर) शिवाराचा आधार घ्यावा लागत आहे. एवढे अंतर पायी चालत जाणे वृद्ध व्यक्तींना शक्य हाेत नसल्याने नागरिकांची फरपट हाेत आहे.
नागरिकांना अंत्यसंस्कार करणे साेयीचे व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रत्येक गावातील स्मशानभूमीत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाताे. याच निधीतून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने हत्तीसरा येथील स्मशानभूमीत जुन्या दहन शेडच्या शेजारी नवीन दहन शेड तयार केले. या स्मशनभूमीत शेडव्यतिरिक्त काेणतीही सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिक अंत्यसंस्कारासाठी गावापासून दाेन किमीवर असलेल्या नांदाेरी शिवारातील नाल्याच्या काठी जातात. या नाल्याच्या काठी नागरिकांना पाणी सहज उपलब्ध हाेत असून, राख विसर्जन करणेही साेपे जाते.
या नाल्यावर जाण्यासाठी हत्तीसरा येथून व्यवस्थित रस्ता नाही. दाेन किमीचा प्रवास कसा तरी करावा लागताे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती असल्याचे हत्तीसरा येथील नागरिकांनी सांगितले. याबाबत आपण ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा माहिती देत ही समस्या साेडविण्याची मागणी केली. मात्र, कुणीही आजवर लक्ष दिले नाही, असा आराेपही त्यांनी केला.
गावातील नवीन ग्रामपंचायत कार्यालयात काही सुविधा करणे अपेक्षित असताना, त्याही करण्यात आल्या नाही. त्यामुळे नागरिकांच्या पदारी निराशाच पडली. यात स्थानिक राजकारण आड आल्याचा आराेप काहींनी केला आहे. परिणामी, या सर्व समस्या साेडविण्याची मागणी नागरिकांनी केली.
...
मूलभूत सुविधांचा अभाव
हत्तीसरा येथील स्मशानभूमी शासनाच्या निधीतून नवीन दहन शेड उभारण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी सावलीची काेणतीही साेय नाही. शिवाय, त्या परिसरात माेठी झाडेदेखील नाहीत. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी रखरखते उन्हात उभे राहावे लागते. या ठिकाणी पाण्याचीही साेय नाही. अंत्यसंस्कारादरम्यान करावयाच्या विधीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने नागरिकांना तिथे गेल्यावर पाण्याचा शाेध घेत भटकावे लागते. या ठिकाणी राख विसर्जनाचीही सुविधा नाही.
...
नागरिकांच्या पदरी निराशा
हत्तीसरा ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली. या कार्यालयासमोर बगिचा, मैदान, वाचनालय व व्यायामशाळेची निर्मिती करण्यात येणार असल्याचे तसेच कार्यालयाच्या मागून रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले हाेते; परंतु यातील कुठलीही बाब अद्याप साकारली नाही. कार्यालय परिसरातील विजेचे ट्रान्सफाॅर्मर अस्ताव्यस्त असून, तेथील तिरप्या तारा व उकिरडे यामुळे या भागात मुलांना खेळणे व वृद्धांना फिरणे अशक्य झाले आहे.