कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : नागपूर जिल्हा व महाराष्ट्राच्या सीमेवर तसेच नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याची इमारत माेडकळीस आल्याने धाेकादायक बनली आहे. पावसाळ्यात या इमारतीचे छत गळत असल्याने त्यावर दरवर्षी ताडपत्री झाकावी लागते. या पडक्या इमारतीतच पाेलिसांना कर्तव्य बजवावे लागते.
देवलापार पाेलीस ठाण्याची इमारत राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. छताला गळती लागू नये म्हणून टाकण्यात आलेली ताडपत्री वादळामुळे उडत असते. संपूर्ण ताडपत्री उडून जाण्याची व त्यातून दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम फार पूर्वी करण्यात आल्याने ती इमारत माेडकळीस आली आहे. राज्य शासनाने नवीन इमारतीला मंजुरी दिली असली तरी काम पुढे सरकले नाही. नवीन इमारत कट्टाजवळ बांधण्यात येणार असल्याचे तसेच त्यासाठी तीन एकर जागा घेण्यात आल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले. मात्र, या इमारत बांधकामाचा कुठेही ठावठिकाणा दिसून येत नाही.
कट्टा हे गाव देवलापारपासून चार किमीवर आहे. देवलापार संवेदनशील असून, गावात पाेलीस ठाणे असल्याने गुन्हेगारांवर पाेलिसांचा वचक आहे. ठाण्याच्या इमारत कट्ट्याला बांधल्यास गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार असल्याचेही काहींनी सांगितले. सध्याचे ठिकाण वर्दळीचे असल्याने सर्वांवर पाेलिसांचा सहज वचक निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन इमारतही याच ठिकाणी असावी. ती पाेलीस कर्मचारी व नागरिकांच्या दृष्टीने साेयीची आणि अवैध वाहतूकदार व धंदेवाल्यांसाठी गैरसाेयीची आहे.
देवलापार येथे पाेलीस ठाणे, कर्मचारी निवासस्थाने आणि पेट्राेल पंपसाठी पुरेशी व साेयीची जागा असून, ती सहज उपलब्ध हाेऊ शकते. हल्ली येथील पाेलीस कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने बकाल असल्याने कर्मचारी नागपूर, कामठी, कन्हान व रामटेक शहरातून राेज ये-जा करतात. सर्व बाबींचा विचार करता पाेलीस ठाणे देवलापारलाच असणे साेयीचे व आवश्यक आहे.
....
८० गावांच्या सुव्यवस्थेची जबाबदारी
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठाण्यावर अपघातांसाेबतच गुरे व दारूच्या अवैध वाहतुकीचाही ताण आहे. या पाेलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १९ ग्रामपंचायतींमधील ८० गावे येत असून, या गावांमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीही या ठाण्यावर आहे. ही गावे आदिवासीबहुल असून, ती करवाही, देवलापार, हिवराबाजार व मानेगाव या चार बीटमध्ये विभागण्यात आली आहे.
...
रिक्त पदांचे ग्रहण कायम
या ठाण्यात तीन अधिकाऱ्यांसह ४० पेक्षा अधिक पाेलीस कर्माचाऱ्यांची मंजुरी आहे. मात्र, अधिकारी वगळता इतर बहुतांश पदे रिक्त आहेत. पाेलिसांच्या कमतरतेमुळे सीमावर्ती भागात पाेलिसांना व्यवस्थित गस्त व विविध अवैध धंद्यांना आळा घालणे शक्य हाेत नाही. महामार्गावर माेठा अपघात झाल्यास किंवा हद्दीत माेठी अनुचित घटना घडल्यास कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते.
...
पेट्राेल पंप साेयीचा आणि गैरसाेयीचा
पाेलीस कल्याण निधीसाठी या ठाण्याला पेट्राेल पंप देण्याची याेजना आहे. पाेलीस ठाणे देवलापारला कायम ठेऊन येथेच पेट्राेल पंप सुरू केल्यास ताे सर्वांच्याच फायद्याचा ठरणार आहे. पण पाेलीस ठाण्यासाेबत पेट्राेल पंपदेखील कट्ट्याला नेल्यास ताे गैरसाेयीचा ठरणार आहे. कट्टा येथे आधीच पेट्राेल पंप असल्याने पेट्राेलची विक्री कमी हाेणार असून, निधी संकलनही समाधानकारक हाेणार नाही, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.