निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्री झाडाखाली झोपू नये असे म्हणतात कारण झाडे रात्री कॉर्बन डायऑक्साईड सोडतात. मात्र गौतम बुद्ध अनेक वर्षे पिंपळाच्या झाडाखाली कसे बसले, हा प्रश्न पडतो. ते बसू शकले कारण पिंपळ वृक्ष रात्रीसुद्धा प्राणवायू सोडतो. पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अॅलोवेरा, कृष्णकमळ आणि घरासमोरील कुंड्यामध्ये ठेवलेल्या काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे यांनी अशा विविध झाडांची अभ्यासपूर्ण नोंद ठेवली आहे. आपल्या संस्कृतीत तुळशीला कित्येक शतकांपासून महत्त्व आहे ते याचमुळे. कडुलिंबामध्येही औषधी गुणधर्म आहेत. याशिवाय अॅलोवेरा, कृ ष्णकमळ, अॅरिका पॉम यांच्यासह कुंड्यात वाढणारे मनी प्लॅन्ट, साप घरात येऊ नये म्हणून लावले जाणारे स्रेक प्लॅन्ट, रबर प्लॅन्ट, जरबेरा, स्पायडर प्लॅन्ट, लॅव्हेंडर, कुंडीतील बांबू प्लॅन्ट, पीस लिली, ड्रासेना, आर्किड, जास्मीन आदी झाडांचा समावेश आहे. फोटोसिन्थेसीस प्रक्रियेद्वारे दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषून आपले अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. रात्री श्वासोच्छ्वास करताना मात्र ऑक्सिजन घेऊन कार्बन सोडतात. मात्र वर उल्लेखिलेली झाडे रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतात किंवा त्यांच्यात प्राणवायू सोडण्याची क्षमता अधिक असते. वाळवंटात पाण्याची कमतरता असलेल्या भागातील वृक्षांमध्येही हा गुणधर्म आढळून येत असल्याचे डॉ. उगेमुगे यांनी सांगितले.
रात्री प्राणवायू सोडण्याच्या क्षमतेबाबत वैज्ञानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र या वनस्पती अतिशय लाभदायक आहेत. वातावरणातील विषारी वायू शोषण्याचा गुणधर्म त्यांच्यात आहे. शिवाय प्राणवायू सोडत असल्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यासही लाभदायक आहेत.- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ