राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मजुरांची अवस्था बिकट असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याेजनेंतर्गत रामटेक तालुक्यात २५८ विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे तालुक्यातील ९१३ मजुरांना काम मिळाल्याने काेराेना संकटाच्या काळात त्यांना थाेडा आधार मिळाला आहे.
रामटेक तालुक्यात मनरेगा अंतर्गत सध्या २५८ विविध कामांना सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी ९१३ मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामामध्ये इंदिरा आवास योजनेच्या २०८ कामांचा समावेश असून, या कामात ५३० मजुरांची नियुक्ती केली आहे. वृक्ष लागवडीच्या ४८ कामावर २५५ मजूर, तलाव खाेलीकरणाच्या दाेन कामासाठी १२८ मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कामावर एकूण ७ काेटी १२ जाख ३५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. एकूण मनुष्य दिन निर्मिती लक्षात घेता, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात २ काेटी ३४ लाख ८७० रुपये खर्च करण्यात आले.
सिंचन विहिरींची ३० कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मनरेगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुढच्या आठवड्यात ही कामे सुरू हाेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यात सार्वजनिक शाेषखड्ड्यांची ३५, वैयक्तिक शाेषखड्ड्यांची ७५, वृक्ष लागवडीची पाच, घरकुल बांधकामाची २३१, विहीर पुनर्भरणाची तीन, नाला खाेलीकरणाची पाच अशी ३५५ कामे सध्या सुरू आहेत. या कामावर ६ काेटी ८५ लाख २६४ रुपये खर्च करण्यात आले. यातून एकूण मनुष्य दिन निर्मिती ही ५ काेटी ६८ लाख ६६० रुपये आहे.
रामटेक तालुक्यात विविध राेजगार हमीची एकूण १,३८७ कामे अपूर्ण आहेत. शिवाय, सन २०२०-२१ मधील ७३३ कामेदेखील अपूर्ण आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान आवास याेजनेची ६६२ कामे अपूर्ण असून, पांदण रस्त्याची ४१ तर शाेषखड्ड्यांची ५२ कामे अपूर्ण आहेत.
...
कुटुंबीयांना दिलासा
काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन यामुळे उद्याेगधंदे व इतर कामे थांबल्यागत झाली आहेत. या काळात अनेकांचे राेजगार गेले असून, ग्रामीण भागातील गरिबांच्या हाताला काम मिळेनासे झाले. उन्हाळ्यात शेतीचीही फारशी कामे राहत नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना कामे मिळणार तरी कशी, कामे नसल्याने उपजीविका करायची कशी, असे प्रश्नही त्यांच्यासमाेर निर्माण झाले. मात्र, प्रशासनाने २५८ का हाेईना कामांना मंजुरी दिल्याने ९१३ मजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
....
संकटकाळात कामाची गरज
काेराेनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील मजुरांना कामाची नितांत गरज आहे. मनरेगा अंतर्गत काही कामे सुरू करण्यात आल्याने मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. त्यांना यापुढेही कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सिंचन विहिरीच्या ३० कामांना मंजुरी मिळाली आहे. ती कामे पुढील आठवड्यात सुरू केली जाईल. या याेजनेमुळे नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा हाेत आहे. मजुरांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जात आहे, अशी प्रतिक्रिया रामटेकचे खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे यांनी व्यक्त केली.