नागपूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या बॅटरी चोरी करणारी टोळी सक्करदरा पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या टोळीच्या पाचजणांना अटक करून त्यांच्याकडून ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नितीन रामचंद्र साहु (वय ३२), मुकेश रामअवतार साहु (३०) रा. अशोक चौक पाचपावली, रितेश शंकर राठोड (२१, रा. कामनानगर), राजकुमार किसनप्रसाद साहु (२९, रा. कळमना) आणि संतोष मातादिन साहु (४०, रा. बिनाकी) अशी आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपासून शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या बॅटरी चोरीला जात होत्या. यामुळे पोलिसांच्या कामात अडथळा येत होता. अनेक प्रमुख चौकात या घटना घडल्यामुळे पोलीस चिंतेत होते. ५ सप्टेंबरला सक्करदरा आणि बिंझाणी चौक येथील कॅमेऱ्याच्या बॅटरीची चोरी झाली. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना एक ऑटो दिसला. ऑटोचा शोध घेत असताना पोलीस त्याचा मालक मुकेश साहुकडे पोहोचले. तो घटनेत आपला हात नसल्याचे सांगत होता. त्याच्या विरुद्ध यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल असल्यामुळे सक्ती दाखविल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली. नितीन, मुकेश, संतोष आणि राजकुमार भंगार व्यावसायिक आहेत. राजकुमारचा कळमनात कारखाना आहे. तेथे नितीन, मुकेश आणि संतोष चोरी केलेल्या बॅटरी विकत होते. बॅटरी वितळवून शिसे काढण्यात येत होते. शिसे खूप महाग आहे. रितेश राठोड ऑटोचालक आहे. आरोपी पहाटे तीन ते पाच दरम्यान ऑटो किंवा बाईकने बॅटरी चोरी करण्यासाठी निघत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून बचाव करण्यासाठी ते वस्तीतून जात आणि येत होते. पहाटे पोलिसांची गस्त कमी असते. यामुळे आरोपी सहज बॅटरी चोरून फरार होत होते. आरोपींकडून ६२ बॅटरीचे बॉक्स, १७६ किलो शिसे, वाहनासह ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
............
बॅटरी चोरणे शेजारील राज्यात गंभीर गुन्हा
शहरात २५० पेक्षा अधिक बॅटरी चोरी करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून सीसीटीव्ही कॅमेराच्या बॅटरी चोरी करणे गंभीर आहे. शेजारील राज्यात अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते. आरोपींनी शहरातील अनेक भंगाराच्या व्यापाऱ्यांना बॅटरी विकल्या आहेत. त्यांना आरोपी बनविण्याऐवजी सोडून देण्यात आले. यात खूप गोंधळ झाल्याची माहिती आहे. गंभीर प्रकरणात अशी भूमिका घेणे आश्चर्याची बाब आहे.
फूड डिलिव्हरीचे काम
रितेश राठोड, मुकेश साहू ऑटो चालविण्यासोबतच ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करतात. कामाच्या दरम्यान ते चोरीचे स्थळ शोधतात. त्यानंतर मुकेशसोबत चोरी करण्यासाठी पोहोचतात. त्यांचा आणखी काही चोऱ्यात हात असल्याची शंका आहे.
............