कमलेश वानखेडे
राजकोट : भाजपचा गड असलेल्या राजकोटमधील दक्षिण व ग्रामीण हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने दोन्ही ठिकाणी आपल्या आमदारांचे तिकीट कापत उमेदवार बदलले आहेत. लेउवा पाटीदार समाजाचे प्राबल्य असलेल्या दक्षिण राजकोटमध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी लेउवा पाटीदार समाजाचेच उमेदवार दिल्याने समाजातील मतदार संभ्रमात आहेत.
त्यामुळे समाजाच्या कार्डपेक्षा पक्षाची ताकदच निकाल लावणार आहे. लेउवा पाटीदार समाज सहसा पक्षापेक्षा स्वत:च्या जातीच्या उमेदवाराला प्राधान्य देतो. दक्षिण मतदारसंघात तर या समाजाचाच प्रभाव जास्त आहे. त्यामुळे तिन्ही प्रमुख पक्षांनी रिस्क घेणे टाळत या समाजातूनच उमेदवारी दिली. तीनही प्रमुख पक्षांचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढत असल्याने नेमके कुणाला मतदान करायचे, यावरून समाजातील मतदारांचीही दुहेरी परीक्षाच होणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. भाजपने येथे विजयाची हॅट्ट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. ते लेउवा पाटीदार समाजाच्या कोडलधाम या संस्थेचे विश्वस्त असून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या जवळचे आहेत. येथे १९९०मध्ये काँग्रेस जिंकली होती. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार हे राजकोट चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.
नकली दागिन्यांचे केंद्र पण व्यापारी म्हणतात हिरा चुनेंगे...
- दक्षिण राजकोट हे जगभरात नकली दागिने निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हे आशियातील सर्वात मोठे दागिने निर्मितीचे केंद्र मानले जाते. या इंडस्ट्रीची उलाढाल कोट्यवधींची आहे. मात्र, नकली दागिन्यांचा व्यापार करणारे येथील व्यापारी ‘चुनाव मे हिरा ही चुनेंगे…’ असं ठासून म्हणत बरेच काही सांगून जातात.
‘ग्रामीण’मध्ये काँग्रेसचा नाराज उमेदवार ‘आप’च्या गळाला
- राजकोट ग्रामीणची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. १९ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा गेल्यावेळी भाजपचे आमदार लाखाभाई सागठिया यांनी फक्त २,१०० मतांनी जिंकली. यावेळी भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ही जागा गमावण्याचा धोका दिसून आला. त्यामुळे भाजपने त्यांचा पत्ता कट करत दोनवेळच्या माजी आमदार व विद्यमान नगरसेविका भानुबेन बाबरिया यांना मैदानात उतरवले. भानुबेन जुन्या-जाणत्या व अनुभवी असून, महिला मतदारांवर त्यांची पकड आहे. काँग्रेसनेही गेल्यावेळी टफ फाइट देणारे उमेदवार वशराम सागठिया यांना बदलून मनपा निवडणुकीत पराभूत झालेले सुरेश मथवार यांना तिकीट दिले आहे. यामुळे नाराज झालेले सागठिया यांनी ऐनवेळी काँग्रेसची साथ सोडत ‘आप’चा झाडू हाती घेतला आहे. सागठिया यांच्यासोबत काँग्रेसची बरीच मते जाण्याची शक्यता असून, याचा फायदा भाजपला होताना दिसतोय. या डॅमेज कंट्रोलसाठी येथे काँग्रेसने संपूर्ण शक्ती लावली आहे. राज्यासह देशभरातील मागासवर्गीय तसेच ओबीसी नेत्यांच्या गावागावात छोट्या बैठका घेतल्या जात आहेत.