काटाेल : काटोल आणि नरखेड तालुक्यांतील भूजल पातळी पूर्ववत करण्यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणासोबतच जलयुक्त शिवार उपक्रमांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यातील बहुतांश कामांचा दर्जा सुमार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या कामात केवळ कंत्राटदारांनी उखळ पांढरे केले असून, शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
पाण्याच्या अतिरिक्त उपशामुळे या दोन्ही तालुक्यांतील काही भाग ‘डार्क झोन’मध्ये गेला आहे. संत्रा व मोसंबीच्या बागांसाठी जमिनीतील पाणी आधीच मोठ्या प्रमाणात उपसण्यात आले होते. ही समस्या सोडविण्यासाठी बंधाऱ्यांसह साठवण तलाव व पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. अलीकडच्या काळात या जलसंसाधनांची दुरुस्ती व खोलीकरणाची कामे करण्यात आली; परंतु ती कामे केवळ कागदावर दिसत असून, वास्तव चित्र भकासच आहे. त्यामुळे या दाेन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्याची मागणी केली जात आहे.